ज्येष्ठ उद्योगपती बजाज ग्रुपचे प्रमुख राहुल बजाज यांचे निधन

0

पुणे – सर्वसामान्यांना आपली टू व्हीलर गाडी स्वस्तात उपलब्ध करण्यासाठी भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती करणारे ज्येष्ठ उद्योगपती बजाज ग्रुपचे प्रमुख राहुल बजाज यांचे आज पुण्यात रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयामध्ये निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी यांनी अखेरचा श्वास घेतला.गेले काही दिवसापासून त्यांच्यावर पुण्याच्या रुबी हॉल मध्ये उपचार सुरु होते.

बजाज समूहाच्या उभारणीमध्ये राहुल बजाज यांचे मोठे योगदान आहे. राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ मध्ये झाला होता. बजाज यांनी अर्थशास्त्र आणि लॉमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’ देखील पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राहुल बजाज यांची १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. बजाज उद्योग समुहाला मोठे करण्यात राहुल बजाज यांचे योगदान मोठे आहे.

गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा होता. राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाची धुरा ही नीरज बजाज यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

२००१ मध्ये त्यांना उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. राहुल बजाज हे केवळ उद्योजक नव्हते तर ते समाजकार्यासाठीही अनेकदा मदत करायचे. २०२० साली त्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर बजाज समुहाच्यावतीने १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. विशेष म्हणजे २०२० मध्ये मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशात पहिल्यांदाच करोना लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांमध्येच बजाज यांनी सामाजिक बांधिलकीचं भान ठेवत ही घोषणा केली होती.भारतीय वाहन उद्योग क्षेत्रातील एक आघाडीचं नाव म्हणून राहुल बजाज यांचं नाव घेतलं जातं.

भारतीय उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना 

राहूल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.राहूल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

राहूल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली. एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवर देखील त्यांनी भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक कार्यही उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी त्याचे उत्तम उदाहरण होते.

राहूल बजाज हे विशेषत: उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्याच्या उद्योग विश्वाचे नुकसान झाले आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात म्हणतात.

राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख 

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच देशाच्या औद्योगिक आणि सामाजिक विकासात बजाज घराण्याचे आणि बजाज उद्योग समूहाचे योगदान फार मोठे आहे. बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांनी आपल्या कार्यकाळात बजाज उद्योग समूहाचा देशात तसेच बाहेर मोठा विस्तार केला.

उद्योगाला आधुनिक व्यवस्थापन तंत्राची जोड देताना त्यांनी ‘बजाज’ हे ब्रँड नाव सर्वतोमुखी केले. देशाच्या उद्योग विश्वासमोरील समस्यांबद्दल आपली मते ते परखडपणे मांडत.

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात तसेच रोजगार निर्मितीत बजाज समूहाचे योगदान मोठे आहे. सामाजिक दायित्वाच्या बाबतीत देखील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.  राहुल बजाज यांच्या निधनामुळे देशाने आणि विशेषतः महाराष्ट्राने एक द्रष्टे औद्योगिक नेतृत्व गमावले आहे.

श्री. बजाज यांना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबीय तसेच बजाज परिवाराला कळवतो असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.

सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग क्षेत्रातील पितामह हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

बजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग जगतातील पितामह हरपला आहे. बजाज कंपनीच्या माध्यमातून भारताला ऑटो उद्योगात स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे निधन हे भारतीय सामाजिक, उद्योग क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, गेल्या पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारुपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले. त्यांचा प्रदीर्घ अनुभव, ज्ञान, दूरदृष्टीचा बजाज उद्योगासह भारतीय ऑटो उद्योगाच्या विकासात मोलाचा वाटा राहिला आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात बजाज कंपनीमुळे भारताला स्वतंत्र ओळख मिळाली. स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जमनालाल बजाज यांचा देश सेवेचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. उद्योग क्षेत्रात कार्यरत असूनही राहुल बजाज यांनी आयुष्यभर सामाजिक भान जपले. त्यांच्या दातृत्वाच्या गुणामुळे अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध राहिले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योग क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी – मंत्री छगन भुजबळ

बजाज उद्योग समूहाचे सर्वेसर्वां ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय उद्योग क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे, अशा शब्दात शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

शोक संदेशात छगन भुजबळ म्हणतात, देशाच्या उद्योग क्षेत्रात ५० वर्षाहून अधिक काळ ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी काम केलं. देशातील उद्योग विश्वाला मोठ्या उंचीवर नेण्यासोबत एक वेगळी ओळख निर्माण करून देण्यात त्यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे. त्यांचा उद्योग क्षेत्रातील प्रदीर्घ अभ्यास अनुभव याच्या जोरावर बजाज उद्योग समूहाला उंचीवर नेऊन ठेवले. उद्योग क्षेत्रासोबतच सामाजिक भान जपत त्यांनी सामाजिक दृष्ट्या देशासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.

ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योग जगतातील एक तारा काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने बजाज कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय बजाज कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे मंत्री छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!