इगतपुरी -कसारा दरम्यान रेल्वे लाईन,बोगद्याच्या डीपीआरसाठी पावणेनऊ कोटी रुपये मंजुर
खा. गोडसे यांच्या सततच्या प्रयत्नांना यश
नाशिक – नाशिकरोड ते मुंबई हा प्रवास जलदगतीने होण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून खासदार गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. इगतपुरी -कसारा या दरम्यानच्या घाट क्षेत्रात सर्वच रेल्वे गाड्या कमी वेगाने धावतात तसेच सिग्नल मिळत नसल्याने रेल्वेगाडयाला सक्तीचा थांबा घ्यावाच लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी कसारा ते इगतपुरी या दरम्यान चौथी आणि पाचवी रेल्वेलाईन टाकण्याच्या कामाचा डीपीआर तयार करणेकामी रेल्वे मंत्रालयाच्या वित्त संचालनालयाने आठ कोटी सत्तर लाख रूपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.केंद्राने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे कसारा ते इगतपुरी या दरम्यान दोन नवीन रेल्वेलाईन आणि बोगदयाच्या कामाचा डीपीआर आता लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.
कसारा – इगतपुरी दरम्यानचा लोहमार्ग घाट परिसरात आहे. सध्या या मार्गावर तिन रेल्वे लाईन आहेत घाट परिसर असल्याने सर्वच रेल्वेगाड्याना बँकर लावण्याची गरज पडत असते.आधीच घाट परिसर त्यात बॅकर लावण्यासाठी जाणारा वेळ यामुळे मुंबईहून मध्यरेल्वे मार्गे जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाडया उशिराने धावत असतात. यातूनच कसारा – इगतपुरी या घाट परिसरात अत्याधुनिक यंत्र सामुग्रीच्या साह्याने नवीन बोगदा आणि चौथी आणि पाचवी नवीन रेल्वेलाईन टाकावी यासाठी खासदार हेमंत गोडसे यांचा केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाकडे सततचा पाठपुरावा सुरू होता.गोडसे यांच्या पाठपुराव्याला आता यश आले आहे.
कसारा ते इगतपुरी या दरम्यान टाकण्यात येणारी चौथी आणि पाचवी नवीन रेल्वेलाईन सुमारे ३२ किलोमीटरची असणार आहे.यापूर्वी सर्वेक्षणाचे काम पूर्ण झालेले असून आता लवकरच डीपीआरचे काम सुरू होणार आहे.नवीन टनल आणि ३२ किलोमीटर लांबीचा नवीन दोन रेल्वेलाईन तयार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वित्त संचालयनाने नुकतेच आठ कोटी सत्तर लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे आता डीपीआर तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.प्रस्तावात कसारा ते इगतपुरी दरम्यान नवीन बोगदा आणि दोन रेल्वे लाईन प्रस्तावित असल्याने भविष्यात मुंबईहून देशभरात मध्य रेल्वे मार्गाहून धावणाऱ्या सुमारे शंभर रेल्वेगाड्या विना अढथळा धावणार असून यामुळे नाशिक – कल्याण लोकल धावण्याचा मार्ग मोकळा हा होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.