नाशिक,दि,८ मार्च २०२४ –मनसेचा १८ वा वर्धापन दिन सोहळा उद्या ९ मार्च ओजी नाशिकमध्ये होत असल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आले आहेत काल गुरुवारी सायंकाळी राज ठाकरे नाशकात दाखल झाले. यावेळी मनसैनिकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी आज शुक्रवारी सकाळी काळाराम मंदिरात आपल्या कुटुंबासह दर्शन घेतले.
राज ठाकरे काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल होत असताना त्यांचे ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.मंदिराबाहेर मनसेकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, असे अनेक बॅनरही परिसरात लावण्यात आले आहे. यावेळी राज ठाकरेंच्या हस्ते आरती करण्यात आली. अमित ठाकरे यांनी यावेळी सपत्नीक पूजा केली.
राज ठाकरे काळाराम मंदिर परिसरात दाखल होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.राज ठाकरेंचे काळाराम मंदिर परिसरात जंगी स्वागत करण्यात आले. मंदिरात प्रवेश केल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर महिलांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. सर्वप्रथम राज ठाकरे यांनी हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. राज ठाकरेंनी यावेळी मनोभावे प्रार्थना केली. त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.अमित ठाकरे यांनी सपत्नीक पूजा केली.
दरम्यान,राम मंदिरात पूजा झाल्यानंतर राज मंदिराच्या बाहेर आलेत.त्यांनी वेगवेगळ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.तसेच चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. राज ठाकरे यांनी चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांची पाहणी केली. तसेच या विद्यार्थ्यांना काही टीप्स देखील दिल्या.