३ तारखे पर्यंत भोंगे उतरवा,राज ठाकरेंचा सरकारला अल्टिमेटम 

0

मुंबई-सर्व मशिदींना ३ मे पर्यंत मुदत देतो, माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे. आम्हाला कोणतीही दंगल, तेढ निर्माण करायचा नाही. राज्याचे स्वास्थ बिघडवायचे नाही. आज १२ तारीख आहे, १२ ते ३ मेपर्यंत सगळ्या मौलवींशी बोलून घ्या, त्यांना समजावून सांगा, भोंगे काढून घ्या,या नंतर जर कोणी भोंगे काढले नाहीत तर देशभरातील मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येईल असा अल्टिमेटम मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.

ठाण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तरसभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी यांनी पुन्हा एकदा मशिदीवरून आपली भूमिका स्पष्ट केली.भोंगे काढण्यासाठी केसेस अंगावर आल्या तर घेऊ, प्रार्थना करायची तर घरात करा, सणवार असेल तर ठीक पण ३६५ दिवस भोंगे चालणार नाही आता फक्त हनुमान चालीसा सांगतोय,पुढचा बाण काढायला लावू नका, असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

सुप्रीम कोर्टाने १८ जुलै २००५ ला  निकाल दिला आहे कोणतेही मोठे वाद्य वाजवू नका.जर सुप्रीम कोर्टाने सांगितले असेल तर राज्य सरकारकडून अंमलबजावणी का होणार नाही. आम्ही हातावर हात ठेवून का बसायचे. ३ मेपर्यंत जर यांनी भोंगे उतरवले नाही तर प्रत्येक मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा. त्यांनाही कळू द्या त्रास काय असतो. एकमेकांना त्रास देणे हा धर्म असू शकत नाही,असंही राज ठाकरेंनी आपला भाषणात ठणकावून सांगितले.

मशिदींवरील  भोंग्यांचा अख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक विषय कुठे आला आहे. तुमची प्रार्थना,आम्हाला का ऐकवताय.भोंगे उतरवा हे नीट सांगून समजत नसेल तर मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार, हा धार्मिक नाही सामाजिक विषय आहे,असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.

Raj Thackeray in Thane

यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार हे खुश झाले की भीती वाटायला लागते. सध्या  शरद पवार हे संजय राऊत यांच्यावर खुश आहेत. त्यामुळे आता संजय राऊत कधी टांगले जातील, हे कळणारही नाही, अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी केली.शरद पवार यांच्या अशाच धोरणामुळे अनेक काँग्रेसवाले गेलेले आहेत. शरद पवार एखादी गोष्ट बोलतात, ती उशीराने समजते. तेव्हाते बोलले होते ते आज लागलंय, हे नंतर कळते, असेही राज ठाकरे यांनी म्हटले. देशात समान नागरी कायदा आणा आणि लोकसंख्येवर नियंत्रण आणणारा कायदा करा अशी मागणी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.