मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा हट्ट अखेर राणा दांपत्यानी मागे घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याला गालबोट लागू नये, म्हणून आपण आंदोलन मागे घेत असल्याचं रवी राणा पत्रकार परिषदेत सांगितले. “मातोश्रीविरोधात मी कुठलंही चुकीचं भाष्य केलं नाही. मातोश्री आणि बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत.पण आम्हाला दु:ख आहे की मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना आमच्या घरावर हल्ला करण्याचा आदेश दिला होता. पोलिसांनी सकाळपासून आम्हाला घरात बंदिस्त केले आहे असे राणा दांपत्यानी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या केलेल्या घोषणेची जोरदार चर्चा सुरू होती.तेव्हापासून या मुद्द्यावर मोठा वाद निर्माण झाला होता.आज सकाळपासूनच शिवसेना कार्यकर्त्यांनी मातोश्री बाहेर आणि नवनीत राणा यांच्या मुंबईतील निवासस्थाना बाहेर गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर राणा दांपत्यानी मातोश्रीवर जाण्याचा निर्णय रद्द केला असून आंदोलन संपवत असल्याचं जाहीर केलं आहे.
“महाराष्ट्रात कुणाला घाबरण्याचं काम नाही. कुणाच्याही धमक्यांना घाबरण्याचं काम नाही. आम्ही कुठल्या दबावालाही बळी पडणारे लोक नाही. आम्ही लोकांची सेवा करून आणि विधानभवन आणि लोकसभेत पोहोचलो आहोत. आज आम्ही ठरवलंय की पूर्ण महाराष्ट्रात पोलीस, जनतेला त्रास होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जरी हनुमान चालीसेचा अवमान केला असला तरी सगळ्यांना होणारा त्रास पाहाता आमचं आंदोलन आम्ही संपवत आहोत”, असं रवी राणा यांनी स्पष्ट केलं.