‘रसवंत गुऱ्हाळ’ एक उत्साहवर्धक कट्टा !

दीपक ठाकूर

0

(दीपक ठाकूर ) दोन दिवसांपूर्वी मनमाडला ऑफिस कामा निमित्ताने गेलो दुपार चे तीनेक वाजले असतील, बरोबर चे कर्मचारी मला एका उसाच्या गुऱ्हाळात रस प्यायला घेऊन गेले, त्याला गुऱ्हाळ म्हणणे जरा धारिष्ट्याचे ठरेल कारण, तिथे इतकी शांतता होती की ती मला असह्य व्हायला लागली, ऑर्डर दिल्यावर मालकाने हळूच गल्ल्या खालच्या कपाटातून एक ऊस काढला, हळुच एक बटन दाबलं आणि एका स्टील च्या मोठ्या डब्यासारखं दिसणाऱ्या मशीन च्या छोट्या छिद्रात तो ऊस घातला आणि त्या डब्यातून रस खाली भांड्यात गळू लागला.असे त्याने ४ ऊस त्या मशीन मध्ये टाकले, मग हळूच प्लॅस्टिक च्या ग्लास तो रस गाळला, आणि हो त्या ग्लास मध्ये आधीच थोडा थोडा बर्फ घातलेला होता.रस टेबल वर आला कधी आणि पोटात गेला कधी काहीच कळलं नाही.

गुपचूप उठलो पैसे दिले आणि बाहेर पडलो.मला आता शांत बसवत नव्हते, कारण हे काही गुऱ्हाळ होते ? गुऱ्हाळ ही कल्पना डोळ्यासमोर आली की आठवते एक सारवलेली  ऐसपैस जागा.त्यात आकाशी ऑईलपेंट दिलेली बाकडे, समोर पत्रा मारलेले टेबल,त्यावर एक छोटीशी छिद्रे असलेली प्लॅस्टिक ची डबी ज्यात मीठ असायचे . मालक पांढरा शुभ्र सदरा लेंगा परिधान  केले, कपाळी अष्टगन्ध त्या मध्ये एक गोलाकार काळा अबीर बुक्का, भरदार मिश्या पण चेहऱ्यावर दिलखुलास हसू. गुऱ्हाळात महात्मा गांधी, नेहरू आणि पटेल यांचं एकत्र रंग बऱ्यापैकी उडालेले छायाचित्र .मशीन ला लावलेल्या घुंगरू चा अखंड मंजुळ खणखणाट आणि काचेच्या ग्लासांची किणकिण. त्या ग्लासां मध्ये तो थंडगार रस,त्यात थोडे मीठ ,म्हणजे स्वर्गच.

महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात एक नवनाथ रसवंती गृह असते, कुतूहलाने मी ह्याची खोलवर माहिती घेतल्यावर असे कळले की पूणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बोपगावी सुमारे साठ सत्तर वर्ष्या पूर्वी तिकडे भरपूर ऊस असल्यामुळे तिकडील शेतकरी मंडळी ऊस तोडून तो बरण्यात भरून मुंबई ला विक्री साठी पाठवायचे. त्यावेळी तिथल्याच कुणालातरी कल्पना आली की रस काढून विकला तर जास्त फायदा होऊ शकतो, आणि हळूहळू गुऱ्हाळ ही संकल्पना अस्तिवात आली,रसवंती गृह व्यवसायामध्ये असणारे जवळपास ९०% व्यावसायिक हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर व  भोर तालुक्यातले. नाथ संप्रदायाचा या भागातील लोकांवर जास्त प्रभाव आहे.  तसेच बोपगाव या ठिकाणी श्री कानिफनाथ यांची समाधी आहे. बोपगाव, चाम्बळी, भिवरी, हिवरे,सासवड, गराडे, कोडीत,पठार वाडी  या गावातील बहुतांश लोक या व्यवसायामध्ये आहेत.

बोपगाव, भिवरी,ही गावे प्राधान्याने आहेत. (ही गावे सासवड – कोंढवा रस्त्यावर आहेत.) तर, हे बोपगाव कानिफनाथांचे समाधी स्थळ असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असल्याने कानिफनाथ हे बहुतेक सर्व रसवंति-गॄहचालकांचे पूजनीय दैवत आहेत. त्यामुळे हे लोक श्रद्धेने कानिफनाथ किंवा नवनाथांचे नाव आपल्या दुकानाला देतात.आता तर फिरते गुर्हाळ किंवा रसवंती जागोजागी दिसून येतात. सम्पूर्ण कुटुंब ह्या व्यवसायात मदत करत असते. रसात आता वेगवेगळ्या गोष्टी मिक्स होऊ लागल्या आहेत.कुणी उसाबरोबर लिंबु,आले घालून रस देतात तर कुणी अननस .परंतु एक मात्र निश्चित की उसाचा रस हा फक्त आणि फक्त बर्फ टाकून पिण्यातच मजा आहे.

मी लहान असताना ५० पैसे फुल ग्लास आणि ३० पैसे हाफ ग्लास असा दर मला आठवतो आणि आणि तो हाफ ग्लास २/३ भरलेला असायचा त्यामुळे आम्ही २ हाफ ग्लास घ्यायचो म्हणजे ६० पैशात सुमारे दिड ग्लास फस्त करायचो.मित्रांनो, कुठलेही शीतपेय पिण्यापेक्षा उसाचा रस शंभर टक्के चांगला आहे, तो फक्त तहानच भागवत नाही तर त्यात काही औषधी गुणधर्म असतात असं जाणकार मंडळी सांगतात. ऊसाचा एक हिरवा थंडगार रस अतिशय उत्साह वर्धक पेय आहे आणि गुऱ्हाळ एक उत्साह पूर्ण कट्टा आहे.
दीपक ठाकूर 
९८३३५१५०५

Deepak Thakur
दीपक ठाकूर

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.