नाशिक जिल्ह्यात पुढील ३ दिवस रेड अलर्ट : जोरदार पाऊस बरसणार
सप्तशृंगी गडावर पावसामुळे हाहाकार : शाळांच्या सुट्ट्यांबाबतचा निर्णय मुख्याध्यापक घेणार - सुनीता धनगर
नाशिक – नाशिक जिल्ह्यासह शहर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावून संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले आहे. परंतु पुढील चार दिवस ही पावसाचा हा धोका कायम असून हवामान विभागाने नाशिकसह पुणे, पालघर ,या जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित केला आहे.गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील नद्यांनी आपले रौद्ररूप धारण केले असून काही गावांचा संपर्क तुटला आहे.सप्तशृंगी गडावर सुद्धा पावसामुळे हाहाकार झाला असून पावसामुळे ५० ते ६० पायऱ्या वाहून गेल्या आहेत त्यात ५ ते ६ नागरीक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. प्रशासन सतर्क असून नदीकाठावरील नागरीकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील केले आहे.
सध्या पावसाचे प्रमाण पाहता, परिस्थिती अशीच असल्यास, परिस्थिती पाहून मुख्याध्यापकांनी शाळेस सुटी देण्याचा निर्णय घ्यावा, सुटी दिल्यास नंतर अभ्यास व शालेय कामकाजाचे दिवस भरुन घेण्याची दक्षता घेण्यात यावी.असे नाशिक महानगर पालिका शिक्षण विभागाच्या ,प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी जनस्थान ऑनलाईनशी बोलतांना सांगितले आहे.
नदीकाठावरील सर्व नागरिकांनी सतर्क रहावे;नदीकाठावर पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये : जिल्हाधिकारी गंगाथरन डी.
जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये मोठ्याप्रमाणावर पाऊस झाला असून काही भागात अतिवृष्टीही झाली आहे. अगामी चार दिवसात जिल्ह्यात अतिप्रमाणावर पाऊस वअतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने धरण प्रकल्पातून विसर्गही सुरू असून प्रसंगी विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नदीकाठावरील सर्व नागरिकांनी सतर्क रहावे,तसेच नदी काठावर पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष गंगाथरन डी. यांनी केले आहे.
यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्या मार्फत आलेल्या व्हाट्सअॅप संदेशानुसार गेल्या तीन ते चार दिवसात झालेला मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे तसेच भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस मुसधार पावसासोबत अतिवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाची तीव्रता वाढल्यास धारणांमधील विसर्गाचे प्रमाणही वाढविण्यात येईल. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, तसेच नदीकाठी पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
सप्तशृंगी गडावर पावसामुळे हाहाकार (व्हिडिओ पहा )