नाशिक,दि,२७ डिसेंबर २०२४ –‘शब्दमल्हार’प्रकाशित आणि अरविंद ओढेकर लिखित ‘ढाबळ’या कथासंग्रहाचे प्रकाशन रविवार दि.२९ डिसेंबर या दिवशी होणार आहे.
अरविंद ओढेकर यांना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज,नाटककार वसंत कानेटकर आणि नाशिकमधील अनेक मान्यवरांचा सहवास लाभला आहे.त्यांच्या सहवासातच ओढेकर यांचे कथा लेखन विकसित झाले आहे. ओढेकर यांची कबुतरांविषयीची निरीक्षणे या संग्रहामध्ये कलात्मक कथारूप घेऊन आली आहेत. यापूर्वी अरविंद ओढेकर यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले असून वाचकांनी त्या दोन्ही कवितासंग्रहांचे चांगले स्वागत केले आहे.निमित्तानिमित्ताने या सर्व कथा प्रसिद्ध झाल्या असून त्यांचे एकत्रित रूप म्हणजेच ‘ढाबळ’ हा कथासंग्रह आहे.
प्रकाशन सोहळ्याप्रसंगी नाशिकमधील ज्येष्ठ विधीज्ञ विलास लोणारी हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर आणि लेखक नंदकुमार देशपांडे हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. कुसुमाग्रज स्मारकातील ‘स्वगत’ सभागृहात रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता या संग्रहाचे प्रकाशन होणार असून साहित्यप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन ‘शब्दमल्हार’ प्रकाशनाच्यावतीने करण्यात आले आहे.