बाबाज थिएटर्सच्या २२ व्या वर्धापनदिना निमित्त “रोटरी कल्चरल फेस्ट”
पाच दिवसाच्या महोत्सवात नाशिककरांना मिळणार वैविध्यपूर्ण मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी
नाशिक,१० सप्टेबर २०२२ – बाबाज थिएटर्सच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ नाशिकरोड यांच्या खास आयोजनातून रोटरी कल्चरल फेस्ट हा पाच दिवसांचा खास सांस्कृतिक महोत्सव नाशिककरांसाठी बुधवार १४ सप्टेंबर ते रविवार १८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत विनामूल्य करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रम वरील दिलेल्या पाच दिवसांत सायंकाळी ५.३० ते रात्री ९ या कालावधीत नेहरू गार्डन जवळील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सादर केला जाईल.
या महोत्सवात बुधवार, १४ सप्टेंबर रोजी ज्ञानेश वर्मा प्रस्तुत राग- रंग हा कार्यक्रम सादर होईल ज्यामध्ये हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध रागदारीवर आधारित गाणी सादर होतील. गुरुवार, १५ सप्टेंबर रोजी फोर्थ वॉल स्कूल ऑफ ड्रामा तर्फे रोहित पगारे लिखित व दिग्दर्शित मृतकाचे नांव काय या सामाजिक व विनोदी नाटकाचा प्रयोग सादर केला जाईल. त्यानंतर शुक्रवार, १६ सप्टेंबर रोजी सप्टेंबर महिन्यात साजरा होणाऱ्या लाडक्या भारतरत्न लता दीदी व विविध गाण्यांनी रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आशाताई भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एव्हरग्रीन लता अशा हा अमोल पाळेकर यांच्या संकल्पनेतून निर्मित झालेल्या कार्यक्रमात त्यांनी अजरामर केलेल्या गीतांचे सादरीकरण केले जाईल.
शनिवार, १७ सप्टेंबर रोजी झी मराठी प्रस्तुत उत्सव नात्यांचा या कार्यक्रमांतर्गत सर्व रसिकप्रेक्षकांसोबत झी मराठीच्या सिरीयल मधील प्रमुख कलावंत संवाद साधतील. तसेच झी मराठीचे गायक, नृत्य कलावंत व सुप्रसिद्ध निवेदक आपली कला सादर करतील.
रविवार, १८ सप्टेंबर रोजी महोत्सवाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सुरुवातीला बाबाच थिएटरच्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवर कलाकारांचा सत्कार होईल. त्यानंतर कलानंद कथक नृत्यसंस्था व लेहरीशा बँड तर्फे ऋतुचक्र, फ्युजन, लहरीशा बँड चे सादरीकरण डॉ. सुमुखी अथनी व प्रसिद्ध तबलावादक कुणाल काळे यांच्या संकल्पनेतून सादर होईल.
महोत्सवात पाच दिवस सादर होणाऱ्या या वैविध्यपूर्ण मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आस्वाद सर्व नाशिककर रसिकप्रेक्षकांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नाशिकरोडच्या अध्यक्षा वर्षा जोशी, सेक्रेटरी ज्ञानेश वर्मा, अश्विनी सरदेशमुख व बाबाज् थिएटरचे अध्यक्ष प्रशांत जुन्नरे यांच्यावतीने करण्यात आले. पत्रकार परिषदेत उपस्थित ज्ञानेश वर्मा, प्रशांत जुन्नरे, अमोल पाळेकर, प्रा. प्रितेश कुलकर्णी, शामराव केदार, एन. सी. देशपांडे, मधुकर अण्णा झेंडे, अश्विनी सरदेशमुख, जे.पी.जाधव, दिलीपसिंह पाटील, मामा तांबे, श्रीराम वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.