रशिया – युक्रेन युद्ध सुरु : भारतीय शेअर बाजार २७०७ अंकांनी कोसळला

गुंतवणूकदारांचे १३ लाख कोटींहून अधिकचं नुकसान

0

मुंबई – रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु झालेल्या युद्धाचा परिणाम जगातील सर्व बाजारांसह भारतीय शेअर बाजारावर झाला असून आज गुरुवारी शेअर बाजारात प्रचंड घसरण झाली. गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला आणि पैसे काढून घेतले. या पडझडीत सेन्सेक्स २७०७ अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तब्बल ८१३ अंकांनी कोसळला आहे.

शेअर बाजारतात २३ मार्च २०२० कोव्हीडच्या संकटानंतर झालेली ही सर्वात मोठी पडझड आहे. आज सेन्सेक्समध्ये ४.७२ टक्क्यांची घसरण होऊन तो ५४,५२९.९१ वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये ४.७८ टक्क्यांची घसरण होऊन तो १६,२४८ वर पोहोचला आहे. शेअर बाजारात आज आलेल्या त्सुनामी मुळे गुंतवणूकदारांचे जवळपास १३ लाख कोटीचे नुकसान झाले असावे असा प्राथमिक अंदाज आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती १०० डॉलर पार

युक्रेनमधील रशियन लष्करी कारवाईनंतर क्रूड ऑईलने ७ वर्षात प्रथमच १०० डॉलरचा टप्पा ओलांडल्याने मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. आजच्या घसरणीत गुंतवणूकदारांचे १३ लाख कोटींहून अधिकचं नुकसान झालं आहे. आज दिसून आलेली अस्थिरता एकत्रितपणे गुंतवणुकदार आणि व्यापारी दोघांसाठीही वेदनादायक होती.

सोने-चांदी दर 

रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे सोने दरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जगभरातील शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणुकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले असल्याचं चित्र आहे.एप्रिल डिलीवरी गोल्डचा दर आज १.४२ टक्क्यांच्या मोठ्या तेजीसह ५१,०९५ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. तर चांदीच्या दरात १.४० टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीसह चांदीचा भाव ६५,४९० रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.