लेखक – परिंदा जोशी, अनु सिंह चौधरी,मिखील मुसळे आणि क्षितिज पटवर्धन.निर्माता – दिनेश विजन, दिग्दर्शक –मिखील मुसळे,कलाकार –निम्र्त कौर,चिन्मय मांडलेकर,सुबोध भावे, राधिका मदन, आशुतोष गायकवाड, सोहम मुजुमदार, भाग्यश्री पटवर्धन सुमित व्यास, रश्मी अगडेकर, लीना शर्मा, प्रियांशु चॅटर्जी.
प्रस्तावना
मानवी जीवनात कधी काय घडेल याची शाश्वती देताच येत नाही. एका रात्रीत करोडपती झालेले आणि एका क्षणात बदनाम झालेले लोक आपण समाजात बघतच आहोत. आता तर काय ‘दुनिया मेरी मुठ्ठीमें’ म्हणता म्हणता मानवाने स्वत:च खाजगी आयुष्य संपूर्ण जगाला कधी उघडून दिलं, ते त्याचं त्यालाही कळलं नाही. आनंदाच्या भरात पिसारा फुलवून थुईथुई नाचणाऱ्या मोराला, आपला पार्श्वभाग उघडा पडल्याची जशी जाणीव नसते. तद्वतच दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात डोकावतांना आपल्यालाही लोकं बघत आहे, याची साधी जाणीवही माणसाला झाली नाही, ही एक शोकांतिकाच आहे. बहुतांशी रसिक, साहजिकपणे एखादा चित्रपट बघण्यापूर्वी त्यांना भावलेल्या लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार यांचा समावेश चित्रपटाच्या नामावलीत असला तरच थिएटरकडे वळतात. खरंतर चित्रपट बघतांना हा निकष निश्चितच योग्य नाही. किंबहुना त्या कथानकातील आशय, पात्र, त्यांचं प्रदर्शन आणि त्यातून मिळणारा अनुभव आणि एकुणात प्रदर्शनातून संस्कृती दर्शन याची अनुभूती घेणं अत्यंत गरजेचं आहे. ‘उनाड आणि गुठली लड्डू’ या दोन चित्रपटांच्या माध्यमातून दोन वेगवेगळ्या संस्कृतीचं दर्शन प्रेक्षकांना झालं. त्यातील अनोळखी व्यक्तिरेखा, त्यांची संस्कृती, वावरतांना, वागतांना आणि बोलतांना आणि परिस्थितीनुरूप व्यक्त होतांनांची शैली प्रेक्षकांना एक वेगळीच अनुभूती देत आपलंसं करून घेते आणि चित्रपटाचा एक भाग बनवून आशय विषय पोहोचवण्यात यशस्वी होतात. ‘सजनी शिंदेका व्हायरल व्हिडीओ’ या चित्रपटाच्या माध्यमाने दिग्दर्शक मिखील मुसळे याने मराठी संस्कृतीचं दर्शन घडवलेलं आहे. म्हणून यातील बहुतांशी कलाकार मराठी आहेत. हा चित्रपट रहस्यमय असून तो सध्याच्या सामाजिक व्यवस्थेमुळे वैयक्तिक जीवनातील समस्यांवर उघडपणे भाष्य करतो. महाराष्ट्रातील एका शिक्षिकेच्या बाबतीत घडलेली कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. मराठी संस्कृती दर्शवतांना केवळ मराठी कलाकार आणि मधून मधून मराठी शब्दांचा वापर एवढ्यावरच समाधान मानण्यावर दिग्दर्शकाचा विश्वास नाही. तर एकुणात कथानकाची मांडणी, त्यातील संवाद, सुयोग्य कलाकारांची केलेली निवड आणि अभिनय याच्या जोरावर व्यक्तिरेखा उभारण्यात दिग्दर्शकाने इच्छित उद्धेश आणि यश प्राप्त केलं आहे.
कथा संहिता
पुणे शहरातील एका शाळेतील शिक्षिका – सजनी शिंदे, कामाच्या निमित्ताने सिंगापूर दौऱ्यावर जाते. तेथील वास्तव्या दरम्यान आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी ती एका बारमध्ये जाते.एकुणात माहोल लक्षात घेता मद्यधुंद आवस्थेत साहजिकपणे नाच-गाण्यात सामील होते. तेव्हा तिची मैत्रीण साहजिकपणे तिचा व्हिडीओ घेते आणि चुकून तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतो.
परिणामस्वरूप त्या एका रात्रीत सजनीचं विश्वच बदलून जातं. सिंगापूरचा दौरा आटोपून ती जेव्हा पुण्याला घरी परतते, तेव्हा घरातील तमाम मंडळी, शाळेतील तिचे सहकारी आणि मुख्यत्वे तिचा होणारा नवरा यापैकी कोणीहो तिचं या घटनेवरील समर्थन किमान ऐकायला देखील तय्यार होत नाहीत. किंबहुना तिला जणूकाही वाळीतच टाकून देतात. साहजिकपणे सिंगापूर दौऱ्यावर असतानाची ती घटना, तिचा तपशील, तो व्हिडीओ आणि त्याचं व्हायरल होणं याबाबत तिचा फारसा काही दोष नसतांना पदरी पडलेला समाजाधिक्कार तिला मानसिक ताणताणाव निर्माण करतो. या जगामध्ये आता आपण एकटे पडलो या विचाराने आणि जाणीवेने अस्वस्थ झालेली सजनी एके दिवशी अचानक वडिलांच्या नावे सुसाईड नोट ठेऊन ‘गायब’ होते.
तिच्या जवळच्या लोकांनी तिला वाळीतच टाकले असल्याने आणि तिच्याशी कोणताही संवाद केला नसल्याने त्यांना या प्रकरणावर कोणताही प्रकाश टाकता येत नाही. पर्यायाने मग हे प्रकरण पोलिसांकडे सोपवलं जातं. डॉबर मॅन मॅडम – पोलीस इन्स्पेक्टर – बेला (निम्र्त कौर) आणि तिचा सहकारी राम पवार (चिन्मय मांडलेकर) यांना सजनीच्या बाबतीत ‘पळून जाणे की पळवून नेणे, आत्महत्या की हत्या अशा शंका आणि त्यादृष्टीने ते तपासाची चक्रे फिरवायला लागतात.
या चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी मिखील मुसळे, परिंदा जोशी, अनु सिंह चौधरी आणि क्षितीज पटवर्धन यांनी पेलली आहे. या चौकडीने सुरुवातीला ‘हत्या कि आत्महत्या’ या अनुषंगाने सुरु होणाऱ्या तपासाला प्रकरणाच्या मुळाशी नेतांना कथानकात रहस्यमयता, उत्सुकता, उत्कंठा निर्माण होईल अशा पद्धतीने एकेक साखळी उलगडली आहे. प्रेक्षकांना रहस्यात गुंतवून कथानकाशी घट्ट बांधून ठेवण्यासाठी कथानकाची पक्की बांधणी आणि दिग्दर्शकाची अचूक मांडणी आवश्यक असते आणि ते महत्वाचं कार्य लेखनाची चौकडी आणि दिग्दर्शक मिखील मुसळे यांनी उत्तमपणे पार पाडलं आहे.
दिग्दर्शन
दिग्दर्शक मिखील मुसळे याने लेखनातही सहभाग नोंदवल्याने कथानकाशी त्याचा नाळ घट्ट जुळलेली आहे. या कथानकाच्या माध्यमातून ‘समाजाचा दांभिकपणा, पोकळ वल्गना आणि वर्तनावर’ प्रकाशझोत टाकला आहे. या चित्रपटाच्या कथानकापेक्षाही यातील व्यक्तिरेखा या संहितेला न्याय देण्याची भूमिका निभावतात. त्यामुळे व्यक्तिरेखेनुरूप सुयोग्य कलाकारांची निवड हे अत्यंत महत्वाचे काम दिग्दर्शकाचे होते आणि ते उत्तमरित्या पार पाडले आहे. सजनी – राधिका मदान, तिने या भूमिकेसाठी आत्मसात केलेला आवाज, टोन आणि बाज या पात्राला अधिक गहिरेपणा देण्यात यशस्वी ठरलेला आहे. पोलीस इन्स्पेक्टर – बेला (निम्र्त कौर), हे पात्र तर या चित्रपटाचा आत्मा आहे. डॉबर मॅन मॅडम अशी प्रतिमा असलेली हि पोलीस अधिकारी, तिचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ आणि रोखठोक व्यवहार या बळांवर तिने भूमिका उत्तम पेलली आहे. राम पवार (चिन्मय मांडलेकर), भाग्यश्री पटवर्धन, सुबोध भावे, आशुतोष गायकवाड, सोहम मुजुमदार आणि सुमित व्यास यांनी दिग्दर्शक बरहुकूम आपापल्या भूमिका निभावल्या आहेत.
सारांश
या चित्रपटाचा आशय आणि मूळ उद्देश हा केवळ ‘सजनीच्या गायब होण्यामागचं कोडं’ हा नसून सदानकदा ‘संस्कृतीचे आणि परंपरा’ याची महती आणि गोडवे गाणारा समाज ‘सो कॉल्ड’ सांस्कृतिक नियमावलीच्या परिघा बाहेर पाऊल टाकलेल्या व्यक्तीला समजून घेण्याला अजिबात थारा तर देतच नाही शिवाय त्याचं समर्थन ऐकून घ्यायलाही तयार होत नाही. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना बंधनात ठेवण्याचीच परंपरा असल्याने अशा घटनेत जर एखादी स्त्री गुंतलेली असेल तर समाजाचा ‘अप्रोच’ कल्पनेबाहेरचा असतो. सर्वानुमते त्या स्त्रीला ‘चारित्र्यहीन, बदफैली, बाहेरख्याली’ अशा विशेषणांनी तिच्या चारित्र्याचे धिंडवडे काढण्यातच धन्यता मानतात. या बाबतीत मागील पिढी जर बुरसटलेल्या विचारांना कवेत घेऊन परंपरांना जपण्याचं ढोंग करत असेल तर आधुनिकतेचा बुरखा घातलेली ‘सो कॉल्ड’ सुशिक्षित पिढी परिस्थितीनुरूप सोयीने प्रतिसाद देत आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या स्त्री कडून घर, संसार, मुलांवर संस्कार, घरातील चालीरीती, सणवार असं सगळं अगदी निगुतीने सांभाळावं असा हट्ट असलेल्या पुरुषांना तीच स्त्री समाजात, मित्रांमध्ये वावरतांना छानछोकी, आधुनिक आणि कमी कपड्यात वावरणारी हवी. तद्वतच बिछान्यात आधुनिक पद्धतीने त्यांची लैंगिक भूक भागवणारी असावी, असा हट्टच असतो. ‘इतकंही मॉड व्हायला सांगितलं नव्हतं’ हे वक्तव्य सजनीच्या प्रियकराच्या तोंडी घालून लेखक दिग्दर्शकाने या रहस्याला एक वेगळं वळण दिलेलं आहे. एकुणात समाजाचा दांभिकपणा, वैचारिक गोंधळ आणि जगण्यातला विरोधाभास’ वक्तव्याने अधिक स्पष्ट होतो. यातून अजून एक निश्चितपणे स्पष्ट होते की, केवळ स्त्रियांच्या बाबतीत अशा प्रसंगी ‘एक माणूस’ म्हणून विचार होतांना अजिबात दिसत नाही. किंबहुना त्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करण्यात संपूर्ण समाज अलिप्तता बाळगत धन्यता मानते. या सगळ्या बाबींचा उलगडा ‘सजनी’ या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून या चित्रपटात होतो. स्त्री वादाचा पुरस्कार करण्याच्या केवळ वल्गना होतात. प्रत्यक्षात स्त्रियांना मिळणारी वागणूक आजही जशीच्या तशीच आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित होतं.
एनसी देशपांडे
9403499654
