नाशिक ,दि. २० ऑक्टोबर २०२४- विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.गेल्या दोन ते अडीच वर्षात राज्यानं अभूतपूर्व सत्तासंघर्ष अनुभवला आहे. महाराष्ट्रातील दोन मोठे पक्ष,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्या नंतर यंदाची पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.अशातच अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या पुतणे समीर भुजबळ नांदगावमधून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.त्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नांदगावच्या राजकीय वर्तुळासोबतच महायुतीतही खळबळ माजली आहे. समीर भुजबळ यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे शिंदे गट भुजबळांसाठी जागा सोडणार? की, समीर भुजबळ अपक्ष लढणार किंवा महाविकास आघाडीचा पर्याय निवडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
समीर भुजबळ सध्या महायुती कडून उमेदवारी मिळेल याच्या प्रतीक्षेत असले तरी सध्या सुहास कांदे हे महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे.मात्र,समीर भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.उमेदवारी न मिळाल्यास भुजबळ इतर पर्यायांचा विचार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या अपक्ष किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढता येईल का? याची देखील चाचपणी भुजबळ यांच्याकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.महत्त्वाची बाब म्हणजे,ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे नेतेही समीर भुजबळांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.
तर दुसरीकडे नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता असल्यानेया मतदारसंघाततुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश घोलप देवळाली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
राज्याचे माजी समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप यांनी शुक्रवारी (१८) शरद पवारांची मुंबईत भेट घेतली.देवळाली विधानसभा मतदारसंघातून आपले पुत्र माजी आमदार योगेश घोलप यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी,यासाठी त्यांनी शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.२०१९ च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले योगेश घोलप यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांनी पराभव केला. त्यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.
त्यानंतर शिवसेनेत झालेल्या बंडानंतर आणि सत्तांतरानंतर माजी मंत्री घोलप यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.येत्या दोन ते तीन दिवसात उमेदवारी बाबतचे चित्र स्पष्ट होणार असून त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येणार आहे