नाशिक,दि,४ ऑगस्ट २०२४ –नाशिक शहर परिसरात पावसाची संततधार सुरु असून गेल्या आठ तासात ७५.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून गोदावरी काठावर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून अनेक छोटे मंदिरे पाण्याखाली गेले आहेत.इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होत असलेल्या पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचे चित्र आहे. इगतपुरी तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
नाशिककरांची तहान भागावणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे.इगतपुरी तालुक्यातील पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने दारणा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.दारणा धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.