पुणे – कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगच ठप्प झाले होते. कोरोनामुळे आर्थिक नुकसान तर झालेच परंतु विद्यार्थ्यांचे मोठ्याप्रमाणात शैक्षणिक नुकसान ही झाले.आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्यातील शाळा प्रत्यक्ष स्वरूपात ऑक्टोबरपासून सुरू झाल्या.राज्यातील आस्थापने आणि कार्यक्रमांवरील निर्बंध टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू ठेवण्या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
यावर्षी पहिली ते नववीच्या शाळा एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार असून यंदा वार्षिक परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना रविवारी देण्यात येणारी आठवडी सुटी आणि शनिवारची हाफ सुटी देखील रद्द करण्यात आली आहे. रविवारी ज्या विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थित राहण्याची इच्छा असेल ते विद्यार्थी वर्गात बसू शकतात असे सांगण्यात आले आहे.
या शैक्षणिक वर्षांत मार्चपासून एप्रिल अखेरपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात करण्याऐवजी पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग असलेल्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवाव्यात. असे हि म्हंटले आहे.देशासह राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाच प्रादुर्भाव कमी झाला असून, कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.