नाशिक(प्रतिनिधी) – नाशिकच्या शर्विन उदय किसवे ह्याची १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड झाली आहे. ९ मे ते २ जुन दरम्यान माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख होतकरू खेळाडूंसाठी हे शिबीर होणार आहे.
डावखुरा सलामीवीर शर्विन संघासाठी यष्टीरक्षकाची भूमिका देखील निभावतो .१४ वर्षे वयोगटापासूनच शर्विनने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विविध स्पर्धात शर्विन फलंदाजीत धावा करण्यात नेहमीच आघाडीवर असतो. शर्विन सध्या कुच बिहार करंडक स्पर्धेत महाराष्ट्र संघातर्फे कोलकता येथे बाद फेरीतील सामने खेळत आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात मुंबईविरुद्ध त्याने अर्धशतकी खेळी केली.
शर्विनच्या या अतिशय महत्वाच्या शिबिरासाठी झालेल्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शर्विनचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.