ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे निधन
मुंबई – ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. शनिवारी मध्यरात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
जयंत पवार हे पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. २०१४ साली महाड येथे झालेल्या १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत पवार यांनी भूषवले होते. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी २०१२ साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.
जयंत पवार यांनी लिहिलेली नाटके
अधांतर
काय डेंजर वारा सुटलाय
टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक)
दरवेशी (एकांकिका)
पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप)
फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)
बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भा़ाषाविषयक)
माझे घरवरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह)
वंश
शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक)
होड्या (एकांकिका)
प्रतिक्रिया
‘संवेदनशील लेखक, नाटककार गमावला’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना श्रध्दांजली
ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
मराठी नाट्य क्षेत्रातील साक्षेपी आणि पत्रकारिता, साहित्य अशा क्षेत्रात निखळ तितकाच संवेदनशील विहार करणारे व्यक्तीमत्व गमावले आहे. मुंबईतील नजरेआड गेलेल्या गिरण्या, कष्टकरी त्यांची गिरणगाव संस्कृती पवार यांच्यामुळे शब्दरूपाने जीवंत आहे. परखड आणि निखळ नाटककार म्हणून त्यांनी आपला असा ठसा उमटवला. या क्षेत्राला त्यांची निश्चितच उणीव भासत राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
__________________
ज्येष्ठ पत्रकार, नाटककार जयंत पवार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
साहित्य अकादमी’ पुरस्कारविजेते साहित्यिक, ज्येष्ठ नाटककार, पत्रकार जयंत पवार यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा, दुर्बल-वंचितांचं जगणं नाटकातून, साहित्यातून जिवंत करणारा सिद्धहस्त लेखक, पुरोगामी, विद्रोही व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, सामाजिक विषयांची आशयघन मांडणी करुन ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी नाट्यक्षेत्र समृद्ध केलं. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक विषय समर्थपणे हाताळले. समाजातील वंचित, दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी लेखणीतून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारलं. जयंत पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या नाट्य, साहित्य, पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
_______________
संवेदनशील, साक्षेपी लेखक आणि नाटककार गमावला – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक, नाटककार जयंत पवार यांच्या निधनामुळे आपण संवेदनशील आणि साक्षेपी लेखक आणि नाटककार गमावला असल्याची भावना संस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणाले, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले श्री. पवार यांनी मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले होते. श्री. जयंत पवार यांनी नेहमीच रंगभूमीवर काहीतरी वेगळे आणण्याचा प्रयत्न केला. अधांतर, काय डेंजर वारा सुटलाय, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक), दरवेशी (एकांकिका), पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप), फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह), बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भाषाविषयक), माझे घर, वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह), वंश, शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक) होड्या (एकांकिका) या त्यांच्या कलाकृती सर्वांच्या स्मरणात राहतील.
श्री. पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना श्री. देशमुख यांनी आपण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे म्हटले आहे.
_______________