कोल्हापूर – महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं.वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलं असून कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसा पासून कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं, सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला- उपमुख्यमंत्री अजित पवार
“महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब म्हणजे सामान्य माणसाचा संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे. सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला आहे.
प्रा. एन. डी. पाटील साहेब निर्भिड, नि:स्पृह, निडर नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी काम केलं. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही रस्त्यावर उतरुन संघर्ष करणाऱ्या प्रा. एन. डी. पाटील साहेबांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये त्यांनी सहकारमंत्री म्हणून काम केलं. आमदार म्हणून काम केलं. विधानमंडळातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक शब्द हा वंचित बांधवांना हक्क मिळवून देण्यासाठी उपयोगात आणला. प्रा. एन. डी. पाटील साहेब हे आमच्या कुटुंबातील सदस्य होते. त्यांचं निधन हे महाराष्ट्रातल्या, सीमाभागातल्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहे. मी प्रा. एन. डी. पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करीत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.