मुंबई,११ मार्च २०२३- ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते आज रात्री १० वाजता मुंबईतील गोरेगाव येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी दुपारी १२:३० वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे अशी माहिती मिळाली आहे. २०१९ मध्ये प्रसिद्ध नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी अखिल भारतीय नाट्यपरिषदेने जीवनगौरव सन्मान प्रदान केला होता. त्यांना आपल्या वृत्तपक्षीय समीक्षेने अनेक कलाकृतींचं विश्लेषण केलं.
रंगभूमीचा प्रत्यक्षानुभव, नाटकाची प्रचंड आवड आणि अभ्यासू वृत्ती यांच्या समन्वयातून त्यांच्यातला समीक्षक घडत गेला होता. वयाची ऐंशी पार करूनही त्यांचं नाटय़वेड तसूभरही कमी झालेलं नव्हतं. आज रात्री १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गोरेगाव येथे ते वास्तव्य करत होते. उद्या तिथूनच ओशिवरा येथे साडेबारा वाजेपर्यंत त्यांची अंत्ययात्रा निघेल अशी माहिती त्यांच्या जवळच्या वक्तीकडून मिळाली आहे.
नाट्य समीक्षक असलेल्या कमलाकर नाडकर्णी यांनी रंगभूमीवरदेखील काम केले आहे. नाडकर्णी यांनी सुधा करमरकर यांच्या ‘लिटल थिएटर’ या संस्थेच्या बजरबट्टू, गणपती बाप्पा मोरया, चिनी बदाम आदी बालनाट्यात काम केले आहे. ‘बहुरूपी’ या प्रायोगिक नाट्यसंस्थेच्या ‘जुलूस’ या नाटकातही त्यांनी काम केले होते. याच नाट्यसंस्थेसाठी राज्य नाट्यस्पर्धेसाठी त्यांनी काही इंग्रजी नाटकांचा मराठीत अनुवाद केला होता. महाराष्ट्रातील काही गावांमध्ये त्यांनी शिबिरांमध्ये नाट्य प्रशिक्षणार्थींनी मार्गदर्शन केले होते. ‘नांदी’ नावाच्या देविदास तेलंग यांच्या पाक्षिकात त्यांनी नाट्यपरीक्षणे लिहायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी लोकप्रभा या साप्ताहिकात नाट्यसमीक्षणास सुरुवात केली होती. पुढे त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये नाट्य समीक्षण करण्यास सुरुवात केली.
दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचं मुंबईत निधन झालं. कमलाकर नाडकर्णी गेली पन्नास वर्षे नाट्यसमीक्षक म्हणून कार्यरत होते. आतापर्यंत अनेक नाटकांवर त्यांनी लिखाण केलं आहे. नाडकर्णींना अ. भा. मराठी नाट्य परिषदेने २०१९ सालचा जीवन गौरव सन्मान देऊन त्यांच्या कारकिर्दीचा सन्मान केला होता.