मुंबई,दि.११ ऑक्टोबर २०२३ –यंदाही शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचाच दसरा मेळावा होईल,हे आता निश्चित झाले आहे.दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान तथा शिवाजी पार्क मिळावे, यासाठी शिंदे गटाने पहिल्यांदा अर्ज करूनही आता माघार घेतल्यामुळे आता दसऱ्याला म्हणजेच दि.२४ ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचाच दसरा मेळावा होईल हे आता स्पष्ट झाले आहे.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा शिंदे गटाचा की, ठाकरेंचा यावरून गेल्या महिनाभरापासून वाद सुरू होता.शिवाजी पार्कची मागणी करण्याचा अर्ज आधी शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी केला आणि त्यानंतर ठाकरे गटाचे विभागप्रमुख महेश सावंत यांनी अर्ज केला होता. नियमानुसार शिवाजी पार्क मैदान शिंदे गटाला मिळणार होते.केवळ वाद नको,म्हणून मैदान कोणाला द्यायचे याबाबत अधिकृत परवानगी देण्यात येत नव्हती. दरम्यान, ठाकरे गटाने शिवाजी पार्कबाबत तातडीने निर्णय घेण्याचा इशारा पालिका प्रशासनाला दिला होता.हा वाद वाढू लागला असतानाच शिवाजी पार्क मैदानासाठी केलेला अर्ज मागे घेत असल्याचे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आपण अर्ज मागे घेत असल्याचे सरवणकर यांनी सांगितले.
त्यामुळे ठाकरे गटाला मैदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.शिंदेंचा दसरा मेळावा आझाद किंवा क्रॉस मैदानात शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदान आणि क्रॉस मैदानाची मागणी केली आहे. यापैकी एक मैदान मागणारा अर्ज पालिकेच्या विभाग कार्यालयात करण्यात आला आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस किंवा ओव्हल मैदानावर होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनीही दिली.आम्ही सहानुभूतीचे राजकारण करत नाही. विकासाचे राजकारण करतो.त्यामुळेच वादात न जाता शिवाजी पार्कऐवजी दुसरे मैदान आम्ही घेत आहोत असे मंत्री दीपक केसरकर म्हणाले..