मुंबई,दि,१५ मार्च २०२४ –लोकसभा निवडणुकीचे बिगुल उद्या वाजणार असून उद्या दुपारी ३ वाजता निवडणूक आयोग देशातील लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे.सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर शिवसेने नंतर राष्ट्रवादीत फूट पडली आहे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सोडून मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षावर आपला दावा सिद्ध करून उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवली आहे.या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातील तब्बल १२ आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतणारअसा खळबळजनक दावा प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केला आहे.चंदपूर येथील ‘निर्भय बनो’सभेत त्यांनी हा दावा केलाय.इतकंच नाही,तर असीम सरोदे यांनी १२ आमदारांच्या नावांची यादी देखील वाचून दाखवली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून त्यांनी नव्याने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे.सध्या उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघात वादळी सभा घेत असून भाजपसह शिंदे गटावर टीकेचा भडीमार करीत आहेत.शिवसेनेतून बंड करणाऱ्यांना धडा शिकवा, असं आवाहन ठाकरे गटाकडून मतदारांना केलं जात आहे. दुसरीकडे लोकसभेच्या जागावाटपावरून महायुतीत खल सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने शिंदे गट आणि अजित पवार गटाला केवळ एक आकडीच जागा देण्याची तयारी दर्शवली आहे.त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार तसेच खासदार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच असीम सरोदे यांच्या दाव्याने या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे.
चंद्रपूर शहरातील न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर गुरुवारी (ता. १४) निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेला संयोजक डॉ.विश्वंभर चौधरी,वकील असीम सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेला नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली. २०२४ लोकसभा निवडणुकीत मोदी-शहा आणि भाजपला सरसकट पराभूत करा, असा संदेश त्यांनी भाषणातून दिला.’एकनाथ शिंदेंचे १२ आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार’ यावेळी उपस्थितांना संबोधित करताना असीम सरोदे म्हणाले, शिवसेना सोडून मुख्यमंत्री शिंदेंसोबत गेलेले १२ आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असून ते परत येण्यास इच्छुक आहे. लवकरच ते परत येतील, असं सांगताना असीम सरोदे यांनी १२ आमदारांच्या नावांची यादीच वाचून दाखवली.या यादीत श्रीनिवास वनगा, लता सोनावणे, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, चिमणराव पाटील, उदयसिंह राजपूत, प्रदीप जयस्वाल, महेश शिंदे आणि प्रकाश आबिटकर या आमदारांचा समावेश असल्याचे त्यांनी जाहीर केले. सरोदेंच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.