नाशिक,दि.१४ मार्च २०२३ – नाशिकच्या राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी समोर येत असून आज माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.अमृता पवार यांच्या भाजप प्रवेशाने नाशिकचे राजकीय गणित बदलणार असून नाशिकच्या लोकसभा निवडणुकीत चुरशीचे राजकारण पाहायला मिळणार आहे.
अमृता पवार या पेशाने आर्किटेक्ट असून माजी खा. स्वर्गीय वसंतराव पवार व मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक च्या माजी सरचिटणीस, निलीमाताई पवार यांच्या सुकन्या आहेत.अमृता पवार नाशिक जिल्हा परिषद सदस्या आणि गोदावरी अर्बन को. ऑप. बॅंकेच्या विद्यमान अध्यक्षा असून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकारी, खा. सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय आहेत.
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीसह इतर घटक पक्षामधून भाजपमध्ये इनकमिंग वाढली आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. मालेगाव येथील डॉ. अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. आता नाशिक जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून राहिलेल्या माजी खासदार डॉ. वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार या भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. त्यामुळे नाशिकमधून नाशिकला चांगले बळ मिळण्याची शक्यता आहे. शिवाय आगामी निडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने चांगला डाव खेळल्याचे दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश झाला . त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. एकीकडे भाजप-शिवसेनेत असलेली फूट आणि महाविकास आघाडीने केलेली एकजूट यामुळे आगामी लोकसभा निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. सलग दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर हेमंत गोडसे निवडून आले आहेत. मात्र आता सत्ताबदल झाला असल्याने शिंदे गट आणि भाजप एकत्र आले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी एकत्र आहे. सोबत वंचित बहुजन आघाडी सुद्धा आहे. त्यामुळे हेमंत गोडसेंना आगामी लोकसभा निवडणूक जड जाणार असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे अमृता पवार या खासदारकीच्या उमेदवार असणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.