रविवारी रंगणार कीर्तन जुगलबंदी
डॉ.वत्सलाबाई बेदरकर यांच्या स्मरणार्थ श्रेयस बडवे आणि सौ.मानसी बडवे यांच्या कीर्तन जुगलबंदीचे आयोजन
नाशिक,दि.१६ डिसेंबर २०२३ –डॉ.वत्सलाबाई श्रीधर बेदरकर यांच्या स्मरणार्थ आज रविवार (दि.१७) बेदरकर परिवारातर्फे कीर्तन जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील ख्यातनाम कीर्तनकार कीर्तनचंद्र श्रेयस बडवे आणि कीर्तनचंद्रिका सौ.मानसी बडवे हे दोघे ही कीर्तन जुगलबंदी प्रस्तुत करणार आहेत.गायनातील जुगलबंदी प्रमाणे हा कीर्तनातील एक वेगळा प्रकार असून एक राष्ट्रीय आख्यान आणि दुसरे आध्यात्मिक आख्यान एकाच वेळी या जुगलबंदीत श्रोतृवृंदाला ऐकावयास मिळेल.
नेहमीच्या कीर्तनाप्रमाणेच पण एकाचवेळी मंचावर दोन वेगळी वेगळी कीर्तने या जुगलबंदीत रंगतात आणि त्याचा शेवट मात्र एक होतो. असा हा प्रकार श्री.व सौ.बडवे यांनीच विकसित केला असून यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली आहे. गंगापूर रोडवरील कुर्तकोटी डॉ. शंकराचार्य न्यासाच्या सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल; तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वानंद बेदरकर आणि समीर बेदरकर यांनी केले आहे.