राज -उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे संकेत !:महाराष्ट्रातील राजकीय गणिते बदलणार ?
राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरेंची प्रतिटाळी
मुंबई,दि,१९ एप्रिल २०२५ –उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात फार काही कठीण वाटत नाही असं मोठं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं आहे. असं सांगत राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना युतीसाठी टाळी दिली आहे. दिग्दर्शक-निर्माता महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी हे विधान केलं आहे. कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमची भांडणं, आमच्या गोष्टी किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे.असं ही राज ठाकरे म्हणाले या पार्श्वभूमीवर आज (19 एप्रिल) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा थेट जाहीरपणे टाळी देत एक प्रकारे मनसे युतीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात उद्धव आणि राज्य ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्मासाठी एकत्र यावं यासाठी मराठी माणसाकडून स्वप्न पाहिलं जात आहे ते पुन्हा एकदा वास्तवात येणार का? याची उत्सुकता आहे.राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत तर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय गणिते बदलतील अशा सर्वसामान्याच्या भावना आहे.
उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकत्र येऊ शकता का? हे संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आहे असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, “कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमची भांडणं, आमच्या गोष्टी किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात फार काही कठीण वाटत नाही”.
आज उद्धव ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना माझ्याकडून जी भांडणं असतील (ती नव्हतीच असेही त्यांनी नमूद केले) मिटवली चला असे म्हणत एक प्रकारे राज ठाकरे यांनी दिलेल्या टाळीला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे या भांडणाचा संदर्भ ते तुम्हाला चर्चा सुरु आहे त्यावरून लक्षात येईल म्हणत राज यांच्या भूमिकेवर जाहीर भाष्य केलं आहे
उद्धव ठाकरे म्हणाले की, किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे,मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रसाठी एकत्र येण्याचं आवाहन आहे.. पण एक अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो, हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो. तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही चालणार. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचं आगत स्वागत करणार नाही, हे पहिलं ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी भांडणं माझ्याकडून नव्हतीच, ती मी मिटवून टाकली चला, पण पहिलं हे ठरवा.असे हि उद्धव ठाकरे म्हणाले दोघांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलतील असे जाणकारांचे मत आहेत.