बेसूर गातो म्हणून सोशल मीडिया स्टारला पोलिसांनी केले अटक

0

ढाका – बांगलादेशातील सोशल मीडिया स्टारला बेसूर गातो म्हणून पोलिसांनी अटक केलीये.हिरो अलोम असे या सोशल मीडिया स्टारचे नाव असून फेसबुकवर अलोमला सुमारे २० लाख लोक फॉलोअर्स आहेत . तसेच, यूट्युबवर त्याचे १४ लाखांहून अधिक सब्स्क्राइबर्स  आहेत. हिरो अलोम ३७ वर्षाचा असून गायक, अभिनेता आणि मॉडेल म्हणून तो बांगलादेशच्या सोशल मीडियात ओळखला जातो, त्याचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. मात्र, या गाण्यांमुळेच त्याला अडचणींचा सामना करावा लागला.

हा हीरो लोकप्रिय असला तरी त्याचा आवाज सुरांच्या व्याकरणातून पाहू गेल्यास तसा बेसूरच असे त्याची गाणी ऐकल्यावर समजेलच . गाण्याची वेगळीच पद्धत, हा त्याच्या लोकप्रियतेचा आधार. जोवर तो साधीसुधी गाणी गात होता तोवर ठीक होते. पण त्याने गेल्या आठवड्यात गाणी निवडली ती रविंद्रनाथ टागोर व काझी नझरूल इस्लाम यांची. या दोघांच्या कवितांना, गाण्यांना, साहित्याला बांगलादेशात मोठा मान. तर, गेल्या आठवड्यात एके दिवशी भल्या सकाळी हे हीरो महाशय आपल्या घरी टागोर व इस्लाम यांची शास्त्रीय गाणी आळवीत होते. तर त्यांच्या दारावर थाप पडली. दार उघडून पाहतात तो समोर पोलिस. ‘अहो साहेब, किती बेसूर गाताय तुम्ही.बेसूर गायक आहात तुम्ही. बंद करा ते तुमचे गाणे…’ असे म्हणत पोलिस हिरोला थेट पोलिस ठाण्यात घेऊन गेले नि तिथे त्याला गजाआड केले. स्वतः हीरो अलोमने एका वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली.

मी बेसूर गायलो म्हणून पोलिसांनी मला सकाळी ६ वाजता उचलले आणि ८ तास ताब्यात ठेवले. मी नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर आणि बांगलादेशचे राष्ट्रीय कवी काझी आश्वासन नजरुल इस्लाम यांची गाणी का गातो?” असे त्यांनी मला विचारल्याचे अलोमने सांगितले. पोलिसांनी मानसिक छळ केला. यासोबतच पुन्हा शास्त्रीय गाणी गाण्यासही मनाई करण्यात आली. याशिवाय माफीनाम्यावर स्वाक्षरीही करायला लावली, असे अलोम म्हणाला.

या प्रकरणाबाबत सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक यूजर्स अलोमच्या समर्थनार्थ उभे असल्याचे चित्र आहे. अलोमचे गायन वाईट असले तरीही नेटकऱ्यांनी याला वैयक्तिक अधिकारांवर हल्ला म्हटले, वाईट गातो म्हणून एखाद्याला तुरुंगात डांबणे चुकीचे आहे असे नेटकऱ्याचे म्हणणे आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.