प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत पाच हजार लाभार्थ्यांना मंजुरी

रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान

0

मुंबई/नाशिक,दि. १५ मार्च २०२४ –सौर ऊर्जा निर्मितीचा वापर करून तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळवून देण्यासाठी च्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यातील पाच हजार वीज ग्राहकांना एकाच वेळी मंजुरीचे संदेश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी पाठविण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू केली आहे. या योजनेचा आज राज्यात उपमुख्यमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र, मा. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, प्रसाद रेशमे आणि योगेश गडकरी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,ज्या लाभार्थ्यांना आज मंजुरी आदेश मिळत आहेत, त्या सर्वांना शुभेच्छा. महावितरणतर्फे मोहीम स्वरुपात ही योजना राबविण्यात यावी. जास्तीत जास्त ग्राहकांना योजनेचा लाभ होण्यासाठी योजनेबद्दल जनजागृती करावी.महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा.लोकेश चंद्र यांनी योजनेची माहिती दिली.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला तीस हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला साठ हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला ७८ हजार रुपये अनुदान मिळते. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची, प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीजबिल शून्य येते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते, अशी ही योजना आहे.

या योजनेत नोंदणी करण्यासाठी पीएम – सूर्यघर हे अत्याधुनिक मोबाईल ॲप ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. त्यावर नोंदणी केल्यानंतर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते.

छतावरील सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या रूफ टॉप सोलर प्रकल्पांसाठी महावितरण राज्यातील ग्राहकांना मदत करते. महावितरणच्या पुढाकाराने यापूर्वी राज्यात १,३८,००० ग्राहकांनी रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविले असून त्यांची एकूण क्षमता १९०० मेगावॅट आहे. यामध्ये एक लाख घरगुती ग्राहकांचा समावेश आहे.

वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणचा ३३०० मेगावॅट हरित ऊर्जा खरेदीचा करार
राज्यातील वाढती कमाल वीज मागणी पूर्ण करण्यासाठी ३३०० मेगावॅट हरित ऊर्जा खरेदीसाठी महावितरणने बुधवारी मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सतलज जल विद्युत निगम लिमिटेड तसेच नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन यांच्यासोबत दोन करार केले. वीज खरेदीचा दर माफक असल्याने वीज खरेदी खर्चात बचत होणे अपेक्षित असून त्यामुळे विजेचा दर मर्यादित ठेवण्यास मदत होईल, असे यावेळी मा. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र, मा. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, प्रसाद रेशमे आणि योगेश गडकरी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महावितरणतर्फे ग्रीन एनर्जीवर भर दिला जात आहे. ही चांगली बाब असून पर्यावरण रक्षणासोबतच ही स्वस्त ऊर्जा महाराष्ट्राच्या ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. देशातील बॅटरी स्टोरेज आधारित ग्रीन एनर्जीचा वापर पीकिंग अवर्समध्ये म्हणजे कमाल मागणीच्या वेळी होणार आहे त्यामुळे सौर ऊर्जा उपलब्ध नसतानाच्या कालावधीत महाग वीज खरेदीची आवश्यकता राहणार नाही. या करारांमुळे नवीनीकरणीय ऊर्जा बंधनाचे लक्ष्य पूर्ण करण्यास मदत होईल. एकंदरित वीज खरेदी खर्चात बचत होऊन ग्राहकांना भविष्यात अधिक किफायतशीर दरात वीज मिळेल, ही चांगली बाब आहे.

महावितरणचे संचालक योगेश गडकरी आणि सतलज जल विद्युत निगम लिमिटेड चे कार्यकारी संचालक पवन वर्मा यांनी १८०० मेगावॅट नविनीकरणीय ऊर्जेसाठी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यामुळे १८०० मेगावॅटची अक्षय ऊर्जेवर आधारित स्टोरेज क्षमता निर्माण होणार असून ती कोणत्याही वीज वितरण कंपनीद्वारे आजवर करार झालेली संपूर्ण देशात सर्वाधिक क्षमता आहे. श्री योगेश गडकरी आणि नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक रणजीत ठाकूर यांनी १५०० मेगावॅट सौर ऊर्जेसाठी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

बुधवारी झालेल्या करारांमुळे वीज खरेदीमध्ये बचत होण्यासोबत हरित ऊर्जेसाठीची जबाबदारी पूर्ण करण्यात मदत होणार आहे. त्यामुळे ‘नेट झिरो’चे उद्दीष्ट गाठण्यास मदत होईल. ही पर्यावरण पूरक ऊर्जा असल्यामुळे कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल.

महावितरणची विजेची मागणी सुमारे २५,४१० मेगावॅट असून वीज पुरवठ्यासाठी करार झालेली क्षमता आता ४१,५७० मेगावॅटवर पोहोचली आहे. त्यामध्ये अक्षय ऊर्जेसाठी करार झालेली क्षमता १४,५५१ मेगावॅट आहे.

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करणे आणि उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करणे यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या कल्पक योजनेअंतर्गत महावितरणची नवीकरणीय ऊर्जा क्षमता ९,१५५ मेगावॅटने वाढणार आहे.

वीज ग्राहकांच्या सेवेसाठी ऊर्जा चॅट बॉट उपलब्ध
महावितरणच्या वीज ग्राहकांना तक्रार निवारण, बिल भरणा, नवीन वीज जोडणी अशा विविध कामांसाठी मदत करणाऱ्या ऊर्जा या चॅट बॉटचे उद्घाटन मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबई येथे केले. महावितरणने आपल्या तीन कोटी ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी आर्टिफिशिअल इंटिलिजन्ससारख्या माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करावा, असे मा. देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

यावेळी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र, मा. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, प्रसाद रेशमे आणि योगेश गडकरी उपस्थित होते.

मा. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ग्राहकांना भरवशाचा, दर्जेदार आणि पुरेसा वीज पुरवठा या मूलमंत्रावर महावितरणचे कामकाज सुरू आहे. ग्राहकांना दर्जेदार आणि वेळेवर सेवा देण्यासाठी ऊर्जा चॅट बॉट उपयोगी ठरेल याची मला खात्री आहे. ऊर्जा चॅट बॉटमुळे ग्राहकांना कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही. दिवसाचे चोवीस तास आणि सप्ताहाचे सातही दिवस सेवा उपलब्ध असल्याने त्यांना सोईनुसार सेवेचा लाभ घेता येईल.

ग्राहकांना आता महानगर क्षेत्रामध्ये तीन दिवसांत, शहरी भागात सात दिवसात आणि ग्रामीण भागात पंधरा दिवसात वीज जोडणी मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे, असेही ते म्हणाले.लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या नव्या चॅट बॉटची माहिती देणारे सादरीकरण केले.

ऊर्जा हे चॅट बॉट महावितरणने विकसित केले आहे. कंपनीच्या वेबसाईटवर आणि ॲपवर ते उपलब्ध आहे. महावितरणशी संबंधित ग्राहकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी या चॅट बॉटमध्ये सुविधा आहे. ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चॅट बॉटद्वारे दिली जातात व त्यातून ग्राहकांना मार्गदर्शन होते. ग्राहकांना त्वरित प्रतिसाद तसेच जलद आणि कार्यक्षम सुविधा प्रदान करणे ही या चॅट बॉटची वैशिष्ट्ये आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.