सूर विश्वास : पौलमी देशमुख यांच्या स्वरातून मिळाली शब्द सूरांची अलवार अनुभूती

0

नाशिक,२६ नोव्हेंबर २०२२-  स्वरांची कोवळी अनुभूती, स्वर आणि शब्द यांची सूरेल रंगानुभूती वातावरणात स्वरमयी साज चढवत होती निमित्त होते ‘सूर विश्वास’ मैफिलीचे. पौलमी देशमुख यांनी समृद्ध गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. पौलमी देशमुख यांचे गायन, सुजित काळे (तबला), अदिती गराडे (संवादिनी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले.

मैफिलीचे हे विसावे पुष्प होते. विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे.

पौलमी देशमुख यांनी मैफिलीची सुरूवात राग ललतने केली. शब्द होते ‘‘रैन का सपना’’, स्वरांतील माधूर्य आणि अर्थपूर्ण यांचा मिलाफ यातून समोर आला. त्यानंतर द्रुत एकतालातील पं. कुमार गंधर्व यांची रचना सादर केली शब्द होते ‘‘नैना भराये’’ उत्तरोत्तर रंगलेल्या मैफिलीत राग विभासमधील शुद्ध दैवत सादर केला ‘‘हे श्याम श्याम भोर ही उठ बैठे’’ परंपरा आणि आधुनिक बंदिशीचा मेळ असलेली राजा मानसिंग यांची विदुषी शाल्मली जोशी यांनी स्वरबद्ध केलेली बंदिश सादर केली. ‘‘सूरन के सूरवीर’’ मृदू व अभिजात अनुभूती होती. मैफिलीचा शेवट पौलमी यांनी स्वरचित रचना सादर करून केली. राग प्रतीक्षा आणि शब्द होते ‘‘मोरे घर आरे प्रीतम प्यारे’’ एक शब्दाची सूरांचा रूणझूण गुंजत ठेवणारीही मैफल आठवणीत राहणारी होती.

सायबर सिक्युरीटी विषयी स्वाती गोरवाडकर यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, आजचे युग आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाचे असून आर्थिक सुरक्षा आणि सजगता याविषयी जागरूकता बाळगावी रेडिओ विश्वासच्या समन्वयक ऋचिता ठाकूर यांनी रेडिओ विश्वासतर्फे आयोजित विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांविषयी माहिती दिली व रेडिओ विश्वास ही जनसामान्यांशी बांधिलकी मानणारे माध्यम असल्याचे सांगितले. त्याचा लाभ जास्तीत जास्त रसिकांना घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबईवर सहकार पॅनल विजयी झाल्याबद्दल विश्वास ठाकूर यांचा सन्मान कवी नरेश महाजन यांनी केला. ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना हिंदी वाचकांसाठी ‘ग्रंथ तुम्हारे द्वार’च्या माध्यमातून जगभर नेणारे विनायक रानडे यांचा सन्मान डॉ. मनोज शिंपी यांनी केला. पौलमी देशमुख यांचा सन्मान स्वाती गोरवाडकर, अदिती गराडे यांचा सन्मान मिलिंद राजवाडे, सुजित काळे यांचा सन्मान किरण जगताप, ऑडिओ पार्टनर विलास पाठक यांचा सन्मान अभय गोसावी यांनी केला.

कार्यक्रमास डॉ. मृदूला बेळे, मिलिंद धटिंगण, योगेश हिरेे, अनिल लाड, संजय भडकमकर, विजय पाटील, गिरीश देवस्थळी, अमर भागवत, चंद्रशेखर ओढेकर, विवेक केळकर, सौरभ देशमुख, डॉ. प्रशांत पाटील, सारिका पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!