नाशिक – भारतीय डाक विभागामार्फत इयत्ता ६ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘दीनदयाळ स्पर्श’ योजना या नावाने फिलाटेली स्कॉलरशिप सुरू करण्यात आली आहे. याअनुषंगाने पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन नाशिक डाक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे.
या संदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, ज्या विद्यार्थ्यांनी हा छंद जोपासला आहे, अशा विद्यार्थ्यांची डाक विभागातर्फे फिलाटेली प्रश्नमंजूषा आणि फिलाटेली प्रकल्प या आधारावर निवड चाचणी घेवून मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई कार्यालयातर्फे एका वर्षासाठी सहा हजार रूपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शालेय विद्यार्थ्यांना टपाल तिकीट संग्रहाची आवड निर्माण व्हावी तसेच या क्षेत्रात नवनवीन संकल्पनांचे संशोधन व्हावे हा आहे. यामध्ये स्टॅम्प आणि इतर संबंधित फिलाटेलिक उत्पादनांवरील संग्रह, प्रशंसा आणि संशोधन, स्टॅम्प गोळा करणे, संबंधित उत्पादने शोधणे, कॅटलॉग करणे, प्रदर्शित करणे, संग्रहित करणे आणि त्यांची देखभाल करणे इत्यादींचा समावेश आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी फिलाटेली डिपॉझिट अकाउंट असणे किंवा मान्यता प्राप्त शाळेच्या फिलाटेली क्लब चा सदस्य असणे आवश्यक आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी फिलाटेली ब्युरो नाशिक मुख्य डाकघर येथे तसेच www.indiapost.gov.in या संकेतस्थाळावर तसेच 0253-2506647 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी कळविले आहे.