भावार्थ दासबोध -भाग १५९

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक ११ समास सात चंचलनदी निरूपण नाम समास 
महामाया हीच नदी परंतु अंतराळामध्ये चिदाकाशामध्ये परब्रम्ह स्वरूपामध्ये वाहत आहे. ती स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये कशी पसरली आहे पहा. खाली वर सर्वत्र आठही दिशांना तिचे पाणी वळसा घालीत आहे. जाणते जगदीशाला जाणतात त्यासारखी ती असते. तिच्या अनंत पात्रांमध्ये पाणी भरलेले आहे, हे अहंकाराचे पाणी पाझरून पाझरून निघून गेले. कित्येक संसारात होते त्यांनी ते चाखले.  त्याच्यापासून दूर राहिले ते वाचले. कोणाला ते कडवट वाटले, कोणाला गुळचट वाटले, कोणाला तर तिखट-तुरट क्षार वाटले. ज्या ज्या पदार्थाला पाणी मिळते तसे  स्वरूप ते प्राप्त करते. जर सखल भूमी असेल तर ते तुंबून राहते.

विषामध्ये गेले तर विष बनते. अमृतामध्ये गेले तर अमृत, सुगंधामध्ये गेले तर सुगंध बनते आणि दुर्गंधामध्ये गेले तर दुर्गंधच बनते. गुण अवगुण मिळतात त्याप्रमाणे त्याच्यावर तसे परिणाम होतात. त्या पाण्याचा महिमा पाण्याशिवाय कोणी जाणू शकत नाही. उदंड वाहणारे पाणी असले की नदी आहे की सरोवर ते समजत नाही. त्यात कित्येक जलचर वास करून आहेत म्हणजे संसारात गुंतून पडलेले आढळतात. उगमाच्या पलीकडे गेले त्यांनी तिथून परतून पाहिले तेव्हा ते पाणीच आटलेले दिसले, पाणीच नाही काही नाही! साक्षात्कारी योगेश्वर म्हणजे वृत्तिशून्य योगाचा ईश्वर याचा तुम्ही व विचार करा, हे किती वेळा सांगू? असे समर्थ विचारतात. इतिश्री दासबोधे  गुरु शिष्य संवादे चंचल नदी निरूपण नाम समास सप्तम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

दशक ११, समास ८ अंतरात्मा विवरण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. आता सर्वकर्त्या ईश्वराला वंदन करूया. तो सर्व देवांचा भर्ता  आहे. त्याचे भजन करूया. त्याच्याशिवाय कोणतेही काम होत नाही. पडलेले पान  देखील त्याच्याशिवाय हलत नाही. त्याच्यामुळे सगळे त्रैलोक्य चालते. तो सगळ्यां देव-दानव-मानवांचा अंतरात्मा आहे, चत्वार खाणी, चत्वार वाणीचा प्रवर्तक आहे.  तो एकटाच सगळं घडवतो, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडवून आणतो, सगळ्या सृष्टीची गोष्ट किती म्हणून सांगायची? असा जो गुप्तेश्वर त्याला ईश्वर म्हणावे, त्याच्यामुळे सगळे लोक थोर थोर ऐश्वर्य भोगतात. अशा ईश्वराला ज्याने ओळखलं तो विश्वंभरच झाला. समाधी सहजस्थितीला आला. मग विचारायचं काम राहत नाही. सगळे तर लोक फिरावे तेव्हा ही गुप्त गोष्ट समजते, अचानकपणे घबाड मिळावं आणि त्याच्यासाठी काही त्रास पडू नये अशा प्रकारचे हे साधारण काही आहे.

असा कोण आहे जो अंतरात्मा पाहतो? बरेचसे लोकं तर अल्प स्वल्प काहीतरी समजलं तरी समाधानी राहतात. त्यासाठीच  आधी विवरण केलेले पुन्हा पुन्हा सांगावे लागते, पुन्हा पुन्हा वाचावे लागते. अंतरात्मा केवढा? कसा? पाहणाऱ्याची काय स्थिती होते? त्याबाबत पाहिल्या आणि ऐकलेल्या गोष्टी आणि विचार हे सांगितले पाहिजेत. खूप ऐकले आणि पाहिले अंतरात्म्याला जे समजत नाही ते सांगितले, प्राणी हा देहधारी आहे, बावळट आहे तो काही जाणत नाही.  पूर्णाचे वर्णन करण्यासाठी अपूर्ण पुरत नाही. त्याचा अखंड विवरण केलं तर विवरण करता करता तो देवापेक्षा वेगळा उरत नाही!  विभक्तपण नसावे असे म्हणतात, तरच त्याला भक्त म्हणता येईल नाहीतर व्यर्थ शीण होईल. खटाटोप होईल. उगाच घर पाहून गेला आणि घरधन्याला ओळखलं नाही! राज्यामधूनच आला पण राजा कोणता ते माहिती नाही! देहाच्या सोबतीने विषयांचा भोग भोगला, देहाच्या संगतीने प्राण्यांनी स्वतःला मिरवून घेतलं. मात्र देह देणाऱ्याला ओळखताना चुकले, हे मोठे नवल आहे.

देह कोणी दिला काय दिला तेच माहितीच नाही असे लोक अविवेकी असतात आणि आपण विवेकी असे म्हणतात. ज्याला जसं वाटेल तसं करावं, मुर्खापासून दूर जाता येत नाही म्हणून शहाणं असावं पण ते शहाणे सुद्धा कधी कधी दीनवाणे होऊन जातात. आपल्या आतमध्ये जे ठेवलेलं आहे ते लक्षात येत नाही आणि दारोदारी धुंडाळू लागतात त्याप्रमाणे अज्ञांनी लोकांना देव समजत नाही. देवाचे ध्यान करील असा सृष्टीवर कोण आहे/ अशी वृत्ती कोणी सांगेल का?

ब्रम्हांडामध्ये प्राणी भरून उरलेले आहेत, त्यांची अनेक रूपे आहेत, अनेक वाणी आहेत. भूगर्भामध्ये आणि दगडामध्ये देखील प्राणी आहेत. असं सगळं काही आहे पण  सगळ्यांच्या ठायी तो आहे. अनेकांत तो एकच वास करून आहे. कित्येकदा तो गुप्त झाला आहे आणि प्रकट झालेला आहे. चंचळ आहे ते  निश्चळ होऊ शकत नाही हे केवळ प्रचितीने जाणण्याची गरज आहे. परब्रम्ह निश्चळ आहे. तत्त्वाने तत्व जेव्हा उडून जाते, तेव्हा देहबुद्धी झडून जाते आणि सगळीकडे निर्मल, निश्चळ, निरंजन दिसते. आपण कोण? कुठे? कसे? असा विवेकाचा मार्ग आहे. जो कच्चा प्राणी आहे त्याला हे समजत नाही. भल्या माणसाने विवेक धरावा. दुस्तर संसार तरावा आणि हरिभक्ती करून आपला वंशच उद्धारावा. असं समर्थ सांगत आहेत. इतिश्री दासबोधे   गुरु शिष्य संवादे अंतरात्मा विवरण नाम समास अष्टम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.