भावार्थ दासबोध -भाग १६०

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक अकरा समास नऊ उपदेश नाम समास  

जय जय रघुवीर समर्थ. आधी कर्माचा प्रसंग. कर्म करणे आवश्यक आहे. त्यात काही चूक निर्माण झाली तर दोष होतो. कर्म सुरू केले त्यात काही त्रुटी राहिली तर जिथे जिथे अंतर पडेल तिथे परमेश्वराचे स्मरण करावे. हरी स्मरण करावे. तो हरी कसा आहे त्याचा विचार करावा. संध्या करण्यापूर्वी २४ नामे घेतली जातात, त्या नामामध्ये तो सहस्रनामी आहे. अनंत नामामध्ये तो अनामी आहे. तो कसा आहे ते अंतर्यामी विवेकद्वारे ओळखावे. ब्राह्मण स्नान संध्या करून आला. मग देवपूजेला बसला. यथासांग देवांच्या प्रतिमांची पूजा केली. नाना देवांच्या नाना प्रतिमा लोक प्रेमाने पूजन करतात, पण ज्याच्या प्रतिमांचे पूजन ते करतात तो परमात्मा कसा आहे हे ओळखले पाहिजे.

ओळखून मग त्याचं भजन करायला हवं. जसा ओळखल्यावर मालकाला पहिल्यांदा नमस्कार करावा लागतो. तसा परमात्मा परमेश्वर कसा आहे हे विचारपूर्वक ओळखायचं, तरच भवसागर पार होऊ शकतो.  भ्रमरुपी भवसागर ओलांडू शकतो. पूजेसाठी प्रतिमा घेतात त्याप्रमाणे अंगामध्ये अंतरात्मा येईल आणि तो अवतारी आपल्याला निजधामाला घेऊन जाईल. जे निजरूप असतात, स्वतःचे  रूप जाणतात त्याला जगतज्योती किंवा सत्वगुणी त्याला जाणती कळा म्हणतात. त्या कळेच्या पोटी कोट्यवधी देव असतात. या अनुभवाच्या गोष्टी प्रत्यय घेऊन पहाव्या. देहपुरामध्ये ईश आहे म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात.

त्याप्रमाणे जगामध्ये जगदीश असं ओळखावे. जाणिवेच्या रूपाने जगात, शरीरात अंतकरणाच्या रूपाने विष्णू अशाप्रकारे ओळखावा. जो विष्णू सगळ्या जगामध्ये आहे तोच आपल्या अंतरामध्ये आहे. कर्ता, भोक्ता तोच आहे.  चतुर अंतरात्म्याने त्याला ओळखावे. तो पाहतो, चाखतो, जाणतो, विचार करतो, आपले परके ओळखतो. तो जगाचा जिव्हाळा म्हणजे अंतःकरण आहे. पण देहलोभाचा अडथळा त्याच्यामध्ये असल्यामुळे देहाच्या संबंधामुळे माणूस आपण वेगळे कोणीतरी आहोत असा अभिमान धरतो. माणूस निर्माण होतो, वाढतो, मरतो. ज्याप्रमाणे चंचळ सागरावर लहरीवर लहरी येतात त्याप्रमाणे त्रैलोक्य होते आणि जाते.  त्रैलोक्य चालवतो म्हणून त्याला तर त्रैलोक्यनायक म्हणतात. असा प्रत्ययाचा विवेक आहे. अंतरात्मा असे बोलला पण तोही तत्त्वांमध्ये आला आता महावाक्याचा विचार केला पाहिजे.

आधी देहधारी पहावा, मग नंतर त्याला जगात पाहावे. नंतर परब्रम्ह प्राप्त होते.  परब्रह्माचा विचार केला, त्याची निवड केली तर सार असार निवडता येईल. चंचलता जाईल, हा निर्धार चुकणार नाही. उत्पत्ती, स्थिती आणि संहार त्याच्यापेक्षा निरंजन आहे वेगळा आहे. असं ज्ञानाचे विज्ञान इथे  प्रगट केले आहे. अष्टदेह, स्थान-मान हे जाणून त्याचं निरसन केलं पाहिजे. मग फक्त  आपल्यापुढे निरंजन विमल ब्रम्ह उरते. विवेकाने विचाराने अनन्य झाले, मग पाहणाऱ्याशिवाय अनुभव घेणारा कोणी निराळा नाही असा प्रत्यय आला. तेव्हा ही सूक्ष्म वृत्ती आहे तिचाही लय झाला पाहिजे असा वाक्यांश श सांगितला तो पाहून त्याचा अनुभव घ्या.वाच्यांश आणि लक्ष्यांश सोडून अनुभव घ्या,असं समर्थ सांगत आहेत. इतीश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे उपदेश नाम समास नवम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!