दशक बारावा समास सातवा विषय त्याग निरुपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. मळमळ होत असेल तर जेवण करणे योग्य नाही. त्याप्रमाणे काही जणांना न्यायनिष्ठुर बोलणं कंटाळवाणे वाटते. विषयांची निंदा मोठ्या प्रमाणावर केली आणि तेच सेवन करीत राहिले, विषयाचा त्याग करून देह चालेल हे घडत नाही. बोलणं एक चालणे एक त्याचं नाव हीन विवेक. त्यालाच सगळे लोक हसायला लागतात. विषयांचा त्याग केल्याशिवाय परलोकप्राप्ती होत नाही, असं ठाई ठाई सांगितलं जाते. प्रपंचामध्ये खाता जेवतात, परमार्थामध्ये काय उपवास करतात? विषयांच्या विषयी दोघेही सारखेच दिसतात. देह चालत असतो तरी विषयांचा त्याग करतो असा कोण आहे? जगामध्ये त्याचा निर्वाह कसा होतो ते मला देवानेच सांगावे..
सगळे विषय सोडायचे आणि मग परमार्थ करायचा असं पाहिलं तर घोटाळा दिसतो! श्रोत्यांनी असा प्रश्न विचारला त्यावर वक्ता उत्तर देत आहे. सावधान होऊन तुम्ही ते ऐका. वैराग्य आणि त्याग असेल तरच परमार्थाचा योग येतो. सर्व प्रपंचाचा त्याग करूनच परमार्थ घडतो. मागे ज्ञानी होऊन गेले त्यांनी भरपूर कष्ट घेतले आणि मगच ते भूमंडळावरती विख्यात झाले. इतर लोक मत्सर करत करत गेले, अन्न अन्न करीत मेले. कित्येकांनी पोटासाठी भ्रष्टाचार केला. मुळात वैराग्य नाही, प्रत्ययाचे ज्ञान नाही. शुद्ध आचरण नाही, तर भजन कसे येईल? अशा प्रकारचे लोक स्वतःला सज्जन म्हणून घेतात हे पाहिलं तर पुढे काय घडेल याचे अनुमान करता येईल. पश्चाताप नाही हेच त्यांचे पूर्वपाप म्हणावे लागेल. दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून त्याला दुःख होते, मला नाही तर तुलाही शोभत नाही, हे तर सगळ्या जगाला ठाऊक आहे. जो खातो आहे त्याला न खाणारा पाहू शकत नाही. भाग्यवान थोर पुरुष असतात त्याची निंदा दिवाळखोर लोकं करतात. सज्जन माणसाला पाहिल्यावर चोरटा चरफडतो. वैराग्यासारखं भाग्य नाही. वैराग्य नाही ते अभागी. वैराग्य नसताना केलेला परमार्थ योग्य नाही. प्रत्यय असलेला ज्ञानी अनासक्त विवेकाच्या योगाने सगळ्याचा त्याग करणारा तो महायोगी ईश्वरी पुरुष जाणावा.
अष्ट सिद्धींची उपेक्षा करून योगाची दीक्षा घेतली तो महादेव घरोघर भिक्षा मागतो त्या ईश्वराची बरोबरी वेशाधारी माणूस कसा करेल? म्हणून त्याची बरोबरी होत नाही. निस्पृहता आणि विवेक असेल त्याचा सगळे लोक त्याचा शोध घेतात. लालची आणि मूर्ख भिकारी लोक दैन्यवाणे असतात. जे विचारापासून दूर गेले, जे आचारापासून भ्रष्ट झाले, विवेक करायला विसरले असे विषयाचे लोभी लोक आहेत त्यांना भजन आवडत नाही. त्यांना पुरश्चरण घडत नाही. त्यांना चांगलं पहावत नाही, पटत नाही. वैराग्य करून भ्रष्ट होत नाहीत, ज्ञान आणि भजन सोडत नाहीत, व्युत्पन्न असतात आणि वाद घालत नाहीत असे लोक थोडे असतात. कष्ट केल्यावर शेत पिकते. चांगली वस्तु तात्काळ विकली जाते. जाणत्या लोकांच्या कौतुकामुळे लोक त्यांना पसंती देतात. इतर लोक मंद भाग्याचे असतात. ते वाईट इच्छेमुळे खोटे झाले. त्यांच्या भ्रष्ट आचरणामुळे ज्ञान कानकोंडे झालेले आहे.
अशुद्ध विषयांचा त्याग करणे, आपल्या कार्याला उपयोगी होईल तेवढेच घेणे, ही विषयत्यागाची लक्षणे ओळखावी. सगळं काही करणारा देव आहे. प्रकृतीचा त्यात हात नाही. असा विवेकाचा अभिप्राय विवेकी लोक जाणतात. ज्याच्याकडे शूरपणा आहे त्याला लहान थोर मानतात. काम करणारा आणि कामचुकार हे एक कसे मानायचे? त्याग आणि अत्याग चतुर लोक जाणतात. बोलावे तसे चालावे. पिंड ब्रह्मांड सर्व यथायोग्य जाणावे. अशाप्रकारे जो सर्व जाणता आहे, तो पूर्णपणे उत्तम लक्षणे असलेला आहे. त्याच्या जीवनाचे सार्थक सहजच होते. इती श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विषयत्याग निरूपण नाम समास सप्तम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७