दशक १३ समास दहा शिकवण निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. उत्तमास उत्तम मानत नाहीत, कनिष्ठालाही ते मान देत नाहीत म्हणून देवाने त्यांना करंटे केले. करंटेपणा सोडून द्यावा आणि उत्तम लक्षणे घ्यावी. हरी कथा पुराण श्रवण करावी. नीती, न्याय, विवेकाने वागावे. अनेकांना राजी ठेवावं. हळूहळू पुण्यकार्य करीत जावे. मुलांच्या चालीने चालावे, मुलांचे मनोगत बोलावे त्याप्रमाणे लोकांना हळूहळू शिकवावे. मुख्य त्यांचं मन राखायचं हे चातुर्याचे लक्षण आहे. या गोष्टी जाणतो तो चतुर. इतर लोक वेडे. मात्र वेड्याला वेडे म्हणू नये, त्याचा कमीपणा कधी बोलू नये. असं केलं तरच निस्पृह माणसाला दिग्विजीयी होता येते. उदंड ठिकाणी अनेक उदंड प्रसंग येतात. ते जाणून यथासांग काम करीत जावे. प्राणिमात्रांच्या अंतकरणांमध्ये जाऊन राहायचं. मन राखले तर त्यांना आपल्या परत भेटीची उत्सुकता लागते. त्यांचे मन राखले नाही तर मग व्यवस्था बरोबर राहत नाही. त्यामुळे सगळ्यांचं मन राखेल तो मोठा महंत. मनोगत राखले की सगळेजण आकर्षित होतात. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास दशम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
अखंड ध्यान नाम दशक चतुर्दश समास एक निस्पृह लक्षण नाम समास
जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. निस्पृहाची शिकवण ऐका. त्यामुळे युक्ती बुद्धी शहाणपण मिळून निरंतर समाधानी रहाल. सोपा मंत्र आहे आणि अनुभव देणारा आहे. साधे औषध आहे आणि त्याच्यामुळे गुण येतो; तसं माझे बोलणे साधे पण अनुभवाचे आहे. अवगुण तत्काळ निघून जातात, उत्तम गुणांची प्राप्ती होते, हे शब्दरूपी औषध श्रोत्यांनी हळूहळू सेवन करावे. निस्पृहता धरू नये, धरली तरी सोडू नये, सोडली तरी ओळखीच्या लोकांमध्ये हिंडू नये. स्त्रीवर दृष्टी ठेवू नये, मनाला गोडी चाखवू नये, आपला धीर गेला तर आपले तोंड दाखवू नये. एका ठिकाणी राहू नये. कानकोंडेपणा सहन करू नये. हावरटपणाने पैसा, स्त्रिया यांच्याकडे पाहू नये.
आचार भ्रष्ट होऊ नये. दिलेले द्रव्य घेऊ नये. आपल्यावर उणा शब्द येऊ नये यासाठी दक्ष राहावे. भिक्षेविषयी लाजू बाळगू नये. जास्त भिक्षा घेऊ नये. विचारलं तरी आपली ओळख देऊ नये. फाटके तुटके, मलीन वस्त्र नेसू नये. गोड अन्न खाऊ नये. दुराग्रह धरू नये. प्रसंगाप्रमाणे वर्तन करावे. भोगी मन असू नये. शारीरिक श्रमामुळे देहाच्या दुःखामुळे त्रासू नये, पुढे जगण्याची आशा धरू नये. आपली विरक्ती कमी होऊ देऊ नये, धारिष्ट नाहीसे होऊ देऊ नये, विवेकाच्या बळावर आपलं ज्ञान मलिन होऊ देऊ नये. करुणारुपी कीर्तन सोडू नये. अंतर्ध्यान मोडू नये. सगुण मूर्तीविषयी प्रेमतंतू तोडू नये. मनामध्ये चिंता धरू नये. कष्टाचे दुःख मानू नये. कठीण समयी काही झालं तरी धीर सोडू नये. एखाद्याने अपमान केला तरी शिण वाटून घेऊ नये. निंदा केली तरी कष्ट मानू नये. धिक्कार केला तरी झुरू नये. लोकांची लाज धरू नये.
लोकांनी लाजवलं तरी लाजू नये. एखाद्याने चिडवलं तरी विरक्त पुरुषाने चिडू नये. चांगला मार्ग सोडू नये, दुर्जन व्यक्तीशी भांडण करू नये, चांडाळाशी संबंध येऊ देऊ नये. तापटपणा बाळगू नये, आपल्याला भांडणासाठी प्रवृत्ती केले तरी भांडू नये. आपली जी सहज स्थिती आहे ती सोडू नये. हसवलं तरी हसू नये. बोलायला लावलं तरी बोलू नये. क्षणोक्षणी कोणी कुठे चाळविले तरी चालू नये. एक वेश धरू नये. एकच ठेवण ठेवू नये. एकच देशामध्ये राहू नये, भ्रमण करीत राहावे. कोणाशी जवळीक साधू नये, दान घेऊ नये, सर्वकाळ सभेमध्ये बसू नये. कोणतेही नियम करून घेऊ नये. कोणालाही भरोसा देऊ नये. मवाळपणाचा अंगीकार करू नये. नित्यनियम सोडू नये. अभ्यास बुडू देऊ नये. काही झालं तरी परतंत्र होऊ नये. असा उपदेश श्री समर्थ करीत आहेत. अधिक उपदेश पाहू या पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७