भावार्थ दासबोध – भाग १८४

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

आजचा रंग -लाल 

अभिनेत्री रुपाली पवार

दशक १४ समास एक निस्पृह लक्षणे 
जय जय रघुवीर समर्थ. लग्नाच्या मुहूर्तावर जाऊ नये, पोटासाठी गाणं गाऊ नये, बिदागी ठरवून कीर्तन करू नये. आपली भिक्षा सोडू नये, वार लावून जेवण करू नये, दुसऱ्याच्या पैशाने तीर्थयात्रा करू नये, दक्षिणा ठरवून सत्कृत्य करू नये, पगारी पुजारी होऊ नये, इनाम दिला तरी निस्पृह माणसाने तो घेऊ नये. कुठे मठ करू नये, केला तरी तोच धरून राहू नये, निस्पृह माणसाने मठपती होऊन बसू नये. निस्पृह  माणसाने सर्व करावे पण त्याच्यामध्ये अडकून पडू नये.

सहजपणे सगळ्यांना भक्तिमार्गावर न्यावे. प्रयत्न केल्याशिवाय राहायचं नाही, आळस दृष्टीमध्ये आणायचा नाही, देह असताना उपासनेचा वियोग घडू देऊ नये. उपाधीमध्ये पडू नये, उपाधी अंगी जडू देऊ नये, अव्यवस्थितपणे भजनमार्ग सोडू नये. जास्त उपाधी करू नये, मात्र थोडाफार उपक्रम करावा, सगुण भक्ती सोडू नये आणि वेगळेपणाचे द्वैत मात्र खोटे. खूप वर्ष फिरत बसू नये, खूप वर्ष एका ठिकाणी राहू नये, खूप कष्ट करू नये, आयते मात्र खाऊ नये.उपवास खोटा. खूप वेळ निजून राहू नये, खूप झोपमोड करू नये,खूप नियम करू नये, नियमरहित राहणे देखील खोटे. खूप लोकांमध्ये जाऊ नये, खूप काळ अरण्यामध्ये राहू नये, फारच देहाचे लाड करू नये आत्महत्या खोटी. खूप लोकांची संगत धरू नये. संतांची संगत सोडू नये.

कर्मठपणा उपयोगाचा नाही आणि अनाचार देखील खोटा आहे. सर्व लौकिक गोष्टी सोडू नये, पण लोकांच्या आधीन जाऊ नये. खूप प्रीती उपयोगाची नाही आणि निष्ठुरता देखील खोटी. खूप संशय धरू नये, मात्र खूप मुक्त मार्ग उपयोगाचा नाही, खूप साधनांमध्ये अडकू नये पण साधन नसतानाही राहू नये. खूप विषय भोगू नये, मात्र साधनासाठी उपयुक्त वस्तूंचा त्याग करू नये, देहाचा लोभ धरू नये आणि खूप त्रास घेणे देखील खोटे. वेगळा अनुभव घेऊ नये आणि अनुभव घेतल्याशिवाय राहू नये. आत्मस्थितीचे जे अनुभव येतात ते बोलू नये मात्र स्तब्धता खोटी. मन लौकिकाकडे येऊ देऊ नये, साधना अभ्यासामध्ये मन गुंतवावं. अलक्ष वस्तूची इच्छा धरू नये पण ब्रह्माची  इच्छा करावी. स्वरूप मन-बुद्धीला अगोचर, न समजणारे आहे हे खरं पण बुद्धी शिवाय मी ब्रह्मच कसा आहे हे कळणार नाही हे कळूनही कळण्याचा मीपणाच्या जाणिवेचा विसर पडला पाहिजे.

मी पण विसरल्यावर शून्यत्व मात्र येता कामा नये. तर केवळ ब्रह्मानंद शिल्लक राहिला पाहिजे. जाणीवेचा विसर पडावा,  मात्र नेणीव खोटी. ज्ञानी असल्याचे सांगू नये, पण ज्ञान नसणे योग्य नाही. अतर्क्य वस्तूचा तर्क करू नये, तर्क केल्याशिवाय खोटं. दृश्याचे स्मरण नको म्हणून  विस्मरणही राहू देऊ नये. काही चर्चा करू नये पण केल्याशिवाय चालत नाही. जगाशी वेगळेपणा दाखवू नये. वर्णसंकर करू नये. आपला धर्म उडवून लावू नये मात्र त्याचा अभिमान देखील खोटा. आशाबद्ध बोलू नये, विचाराशिवाय चालू नये, काही केलं तरी आपलं समाधान नष्ट होऊ देऊ नये.

विस्कळीत पोथी लिहू नये. पोथीशिवाय काही उपयोग नाही. विस्कळीत काही वाचू नये आणि वाचल्याशिवाय राहणे खोटं. निस्पृहाने वक्तृत्व सोडू नये. कोणी शंका घेतली, प्रश्न विचारला तर भांडू नये. श्रोत्यांचा वीट मानू नये. ही शिकवण मनामध्ये धरली तर सगळी सुखे प्राप्त होतील आणि अंगामध्ये महंतपण बाणवले जाईल. इतीश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे निस्पृहलक्षण नाम समास प्रथम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!