आजचा रंग – राखाडी

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा. योग्य फोटो जनस्थान ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील ..email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा (कृपया कॉल करू नये)
दशक १४ समास ४ कीर्तन लक्षण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. कीर्तन लक्षण या समासाचे वैशिष्ट्य असे की यामध्ये ज्ञ हे अक्षर सोडून बाकीच्या क पासून सर्व ३५ व्यंजनांना धरून ओव्या केल्या आहेत. अर्थात त्यातील रचना कौशल्य जाणून घेण्यासठी मूळ ओव्या पाहाव्या लागतील. येथे त्यातील अर्थ जाणून घेताना काही मजेदार शब्द ऐकायला मिळतील. कलियुगात कीर्तन करावे. कीर्तनामध्ये केवळ कोमल कुशल गावे. कठीण, कर्कश्य, किरट्या आवाजातील गायन करू नये. कटकट नष्ट करावी, खळखळ करू नये, खरे खोटे यामध्ये आपली वृत्ती अडकू देऊ नये. गर्वाने गाणे गाऊ नये. गाता गाता थांबू नये. गुप्त गोष्टी सांगू नये, गुणगान मात्र करावे. घासाघाशी, घीसघीस, ओरडणे, घुमणे योग्य नाही.
भगवंताची नाना नामे, नाना सगुण ध्याने वर्णन करून कीर्तीची कीर्तने अद्भुत अशी करावी. चावट, चकमक करणारे, चरचरीत नसलेले असे कीर्तन करावे. श्रोत्यांचा छळ छळ छळणा करू नये. छळता छळता छळू नये. कोणा एखाद्याला लक्ष्य करून त्याला छळणे करू नये. जी जी जी जी जी जी म्हणत बसू नये. जो जो जागेल तो पावन होईल. जप जपुन जनता जनार्दनाला संतोष्ट करावे. जिथे सुंदर कीर्तन झिरपते, भक्तीचे पाणी पाझरते तेथे सर्व लोक जमा होतात. मग त्यांना इथे या या या असे म्हणावे लागत नाही. या या या येण्यासाठी वेगळे उपाय लागत नाहीत. सुबुद्ध माणसाला कीर्तनास या या असे म्हणावं लागत नाही. आवाजाची टकटक टकटक करू नये.
टाळाटाळी टिकवू नये. कंटाळवाणी टमटम टमटम म्हणजे बडबड लावू नये. ठसठस ठोंबस म्हणजे मूर्ख लोकांना कीर्तन आवडत नाही. त्यांना ठक ठक ठक ठक म्हणजे जागृत व्हावे असे वाटत नाही. त्यांना मूर्ती ध्यान नकोसे वाटते. डळमळ होऊ देवू नये, कीर्तन करताना डगमग डगमग कामाची नाही, एकारले पणाने चुका होऊ देऊ नये. ढिसाळपणे कीर्तन केले तर अज्ञानी ढोबळे लोक नाचतात मात्र अन्य लोकांना ते कंटाळवाणे होते. नाना उपमा अलंकार असलेले, नेटके, चतुर, नम्र, गुणाचा साठा असलेले, नेमके, मधुर नेमस्त गाणे असावे. टाळ, तंबोरे, ताना, तालबद्ध तंतुमय वाद्यांची साथ असलेले गाणे तत्काळ तन मनाने गायील्यास लोकांची मने तल्लीन होतात. उंच स्वरामुळे श्रोत्यांच्या मनात थरारक रोमांच उभे राहतात. त्याने तत्काळ तार्किक देखील तल्लीन होतात. त्यात प्रेमळ भक्त गिरक्या घेत नाच करतात. कीर्तनकौशल्य प्रगट झाले की, जग दुमदुमून जाते, सर्वत्र भक्तीचे वातावरण तयार होते. धूर्त देखील लगेच धावून आले, भक्तीत दंग झाले, कीर्तनाचा रंग मस्त जमला. नाना सुंदर नाटके, नाना प्रमाण,उपमा, मर्यादा यामुळे कीर्तन रंगले. परत जाणाऱ्यांच्या अंतरात कीर्तनाची चटक निर्माण झाली. फुकट फाकट आडमार्गी न्यायचे नाही,
फटकळ पिंगा फुगडी नाही, फोल बिन कामाचे बोल नाहीत, कुटाळक्या निंदा करायची नाही. अनेक बरे बरे म्हणणारे बाबा बाबा असे उदंड म्हणणारे कथेसाठी मागे लागतात. मात्र चांगला भला भक्तीभाव, परोपकार हेच भाविकांचे भूषण होय. लोकांचे मन जिंकले, त्यांनी आपल्याला मानले तरी त्यांच्या प्रेमाने ममतेने गर्विष्ठ होऊ नये. असे मी मी मी मी म्हणणारे अनेक आहेत. चांगले कीर्तन केले तर एकमेकांशी बोलून मोठ्या प्रमाणावर श्रोते येतात त्यांना या या या या म्हणावे लागत नाही. रसाळ राग रंग, सुंदर संगीत यामुळे ते आकर्षित होतात. रत्नाची परीक्षा करून रत्नमागे लोक धावतात. त्यांचे लोचना कीर्तनाकडे लागतात, कीर्तनामुळे चकित होतात, आवडीमुळे घाईघाईने येतात. कीर्तनात वावगे वचन बोलू नये, अंतःकरणात वाकडेतिकडेपणा नाही, वक्तृत्वामुळे लोकांना शांत केले जाते. सारासार अर्थ लोकांना शिकविला जातो. सर्व वाद्ये बरोबर घेऊन केलेले संगीत हे देखील सज्जन लोकांना बरे वाटते. असं कीर्तनाचा मनोरंजक वर्णन समर्थ करीत आहे पुढील वर्णन ऐकू या पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

मोबाइल- ९४२०६९५१२७