भावार्थ दासबोध – भाग २०१

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक १४ समास ५ चंचल लक्षण निरूपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. चंचल हा अंतरात्मा, चंचलाच्या मूळ मायेच्या सर्व व्यापालाच जर पूर्णपणे ओळखू शकत नाही तर निश्चल अशा अपाराचे अनुमान कसे करता येईल? आकाशामध्ये शोभेचा दारूचा बाण गेल्यावर तो पलीकडे जाईल कसा? जाताना मध्येच विझेल! हा त्याचा स्वभाव आहे. त्याप्रमाणे मनोधर्म हे एका ठिकाणी असतात त्यामुळे त्याला वस्तू म्हणजे परब्रम्ह आकलन होत नाही. निर्गुण सोडून तो करंटेपणामुळे सर्व ब्रह्म असं म्हणतो. त्याच्याकडे सारासार विचार नसतो. तिथे सगळा अंध:कार असतो. खरं सोडून खोटं म्हणजेच नेणतेपणारुपी पोर तो घेतो. ब्रम्हांडाचे महाकारण म्हणजे मूळ माया. तिथ पंचीकरण असून महावाक्याचं विवरण वेगळंच आहे.

महतत्त्व महदभूत म्हणजेच भगवंत होय. मूळ मायेमध्येच द्वैतरुपी उपासनेची समाप्ती होते. पुढे केवळ तादात्म्यता. कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्हीसाठी वेद हे प्रमाण आहेत. परब्रम्हाला मिळाल्यावर ज्ञानाचे देखील विज्ञान होतं. इतिश्री दासबोधे गुरु शिष्यसंवादे चंचळ लक्षण निरूपण नाम समास पंचम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

दशक १५ समास सहा चातुर्य विवरण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. दिव्यापासून किंवा पिवळ्या हिरड्यापासून काळी शाई किंवा काजळ निर्माण होते. ज्ञानप्रसार करण्यासाठी शाई उपयुक्त ठरते. लेखनाशिवाय ज्ञान होईल, हे घडत नाही. लिखाण हे छोटे असले तरी तिथे सगळ्या गोष्टींची साठवण होते. अधम आणि उत्तम गुण तिथेच असतात. बोरू पुढे केला त्याला छेद देऊन टोक तयार केले. त्या दोन्ही मिळून म्हणजे बोरू आणि शाई यामुळे काम सुरू ठेवले. कागदावर पांढऱ्यावर श्वेत आणि अश्वेत म्हणजे पांढऱ्यावर काळे यांची गाठ पडली. त्याच्यामध्ये कृष्ण मिश्रित झाल्यावर या लोकाची सार्थकता होते. याचा विचार केला तर मूर्ख माणूस देखील चतुर होतो. त्याला परलोकीचा साक्षात्कार होतो.

सगळ्यांना मान्य असलेल्या माइक संसाराचा अंगीकार शहाणा साधक करीत नसतो. उत्तम, मध्यम, कनिष्ठ अशा रेखा आहेत. मात्र अदृष्ट ही गुप्त रेषा आहे. नशिबाचे हे चार वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे प्रत्येकाचे अनुभव सारखे होत नाहीत. चौदा पिढ्यांचे पोवाडे सांगतात ते शहाणे की वेडे? हल्ली तसेच आहे की नाही ते पाहावे. नशिबाची रेषा प्रभूकृपेने बदलता येते.  याचा प्रत्यक्ष प्रत्यय येतो. ते पाहताना डोळे कशासाठी झाकायचे? अनेकांचं बोलणं ऐकून काम करायला लागले ते लोक अंदाजपंचे बुडाले.

मुख्य निश्चय नसल्याने अनुभव आला नाही. उदंड लोकांचं उदंड ऐकावं परंतु त्याचा अनुभव घेऊन पडताळून पहावं  मग अंतर्यामी विचार करून खरं खोटं निवडावं. कोणालाही नाही म्हणू नये. त्याच्यातील सांगणं, अपाय, उपाय दोन्ही लक्षात घ्यावे, त्याचा अनुभव घ्यावा; अधिक काय सांगायचं? माणसं एककल्ली आणि कच्चे असले तरी त्यांचे ऐकून घ्यावे. अशा प्रकारे अनेकांचं मन राखावं. अंतकरणांमध्ये पीळ पेच किंवा पूर्वग्रह असेल तर नाना तऱ्हेने त्रास होतो. मग शहाणा कसे निभावू शकेल?  वेड्यांना शहाणं करावं तरच आपलं जीवन अर्थपूर्ण होईल. उगाच वादंग वाढवणे हा मूर्खपणा आहे. एकमेकांना मिळून जाऊन मिळवावे, प्रसंगी पड खावी, कमीपणा घेऊन त्याला उलटावे व विवेकाचा विचार करून काहीच कळत नाही असं दाखवावं. दुसऱ्यांच्या चालीने चालावं, दुसऱ्यांच्या बोलाने बोलावं, दुसऱ्यांच्या मनोगतात मिसळून जावं. जो दुसऱ्याच्या हितावर गदा आणतो, वितुष्ट आणतो,त्याला काहीच करता येत नाही. त्याचा ऐकत ऐकत त्याचा अंतकरण जाणून घ्यावं मग त्याच्या मनावर ताबा मिळवावा.

मग हळूहळू समजून घ्यावे  आणि मग त्याला परलोकाकडे न्यावं. भांडखोर माणसाला भांडकुदळ मिळाला तर गोंधळ होतो. कलह निर्माण झाल्यास चातुर्याला जागा राहत नाही. उगीच बडबड करतात पण करून दाखवणे अवघड आहे. मोक्षभवनाची साधना जड आहे, कठीण आहे. धक्के, चपेटे, टक्के टोणपे वाईट शब्द सहन करीत जावे आणि मग पस्तावा होऊन लोक आपले होतात. असं समर्थ सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.