दशक १५ समास ६ चातुर्य विवरण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. प्रसंग जाणून बोलावं.आपण शहाणे आहोत असं दाखवू नये.सर्वत्र विनम्रता धरून जावे.दुर्गम खेडी किंवा शहर येथे जाऊन अनेक घरे पहावी, भिक्षा मागण्याच्या निमित्ताने लहान थोर लोकांची परीक्षा करून सोडावे. पुष्कळ लोकांच्या ठिकाणी काहीतरी घेण्यासारखा गुण आढळतो. चतुर लोकांशी मैत्री घडते, शांत बसला तर काहीच घडत नाही म्हणून फिरणे, विवरण करणे हवे. सावधपणे सर्व जाणावे, आधीच सर्व माहिती घ्यावी. जाण्याला योग्य असेल तिथे विचारपूर्वक जावे.
नाना जिन्नस पाठांतर करावी, त्यामुळे लोकांचे अंतकरण शांत होतं. लिहिताना आणि परोपकार करताना कोणतीही मर्यादा बाळगू नये. ज्याला जे पाहिजे ते त्याला द्यावे, मग आपण सगळ्यांना मान्य व श्रेष्ठ होतो. भूमंडळावर जो सगळ्यांना मान्य झाला त्याला सामान्य म्हणू नये. कित्येक लोक अनन्यपणे त्या पुरुषाला मानतात. अशी चातुर्याची लक्षण आहेत. चातुर्य बाळगून दिग्विजय करायचे मग तिथे काहीही कमी पडणार नाही. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य विवरण नाम समास षष्ठ समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक १५ समास सातवा अधोर्ध्व निरूपण नाम समास
मूळ माया हेच नानाविकारांचे मूळ आहे. अचंचलात चंचल असलेली मूळमाया सूक्ष्मरूपाने राहते. मूळमाया जाणीवरूप आहे. षड्गुणेश्वराची ओळख याच प्रकारे पटते. प्रकृती-पुरुष-शिवशक्ती-अर्धनारी नटेश्वर असं त्याला म्हणतात परंतु त्याचे खरे मूळ जगज्ज्योती आहे. संकल्प फिरत राहणे हे वायूचे लक्षण आहे. वायू आणि त्रिगुण आणि पंचभूत यांचे लक्षण आहे. कोणता तरी एक वेल पाहिला तर त्याच्या मुळ्या या खोल गेलेल्या असतात. पाने, फुले, फळे यांचे अस्तित्व मुळाच्या मुळे आहे. त्याप्रमाणेच नाना रंग, आकारविकार तरंग असतात, नाना स्वाद मुळामुळे असतात. पण हेच मूळ फोडून पाहिले तर काहीच हाताला लागत नाही. पण पुढे त्याच्यातूनच हे सगळं निघालेलं असतं. डोंगरकड्यावरून वेल निघाला, तो खाली फोफावला, भूमंडलावर आला. तशी मूळमाया जाणावी. पंचभूत आणि त्रिगुण मूळमायेतच आहेत.
अखंड वेल पुढे वाढला, नानाविकार त्याच्यामध्ये निर्माण झाले. आणि विचारांचा असंभाव्य विकार झाला. पुन्हा वेगवेगळ्या शाखा फुटल्या त्यांचे समुदाय वाढले. सृष्टीमध्ये त्यांची नाना टोक वाढली. कित्येक फळे पडतात, आणखी फळे निघतात आणि पडतात असे नेहमी होते जाते. एक वेल वाळली, पुन्हा तिथे नवीन वेल फुटला. असे कित्येक आले आणि गेले. पाने झडतात आणि फुटतात, फळ आणि फूल यांचे देखील तसंच आहे आणि त्याच्यामध्ये हे जीव असंभाव्यरित्या जगतात. संपूर्ण वेलच करपून जातो, पण मुळापासून पुन्हा होतो. असा जो विचार आहे तो प्रत्यक्ष जाणावा. वासनामय मूळ खणून काढलं, प्रत्यय ज्ञानाने निर्मूलन केलं की मग मात्र त्याच वाढणं थांबून जातं. मुळामध्ये बीज आहे, शेवटी बीज आहे, मध्ये जलरूपी बीज आहे असा हा सहज स्वभाव विस्तारलेला आहे.
बी पासून झालेली सृष्टी पाने, फळे, इत्यादी बी मध्ये दिसत नसूनही काय असते तेच प्रकट सांगत असते. त्याप्रमाणे तो अंश पाहून कष्टी न होता वाढतो, न होता जातो, जातो येतो पुन्हा जातो अशी पुनरावृत्ती करत राहतो परंतु जो आत्मज्ञानी आहे त्याला जन्म मरण नसते. हे घडलं असं म्हणायचं तरी काहीतरी जाणवलं. मात्र सगळ्यांना ते कसं ठाऊक होईल? त्याप्रमाणे अंतरात्म्याच्या बळावर कार्यभाग करतात परंतु त्यालाच लोक जाणत नाहीत! तो दिसत नाही त्याला बापडे लोक काय करणार! त्याप्रमाणे विषय भोग घडतो तिथे काहीच घडत नाही. त्याच्यावाचून काहीच घडत नाही. स्थूल सोडून सूक्ष्म असा विचार करावा. शरीराचे भेद वेगवेगळे असले तरी आपले अंतर्मन आणि जग हे एकरूपच आहेत. असं समर्थ सांगत आहेत हा भाग येथे समाप्त झाला असून पुढील कथा ऐकू या पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७