दशक १६ समास दोन सूर्य स्तवन निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. हरिहरांच्या अनेक अवतार मूर्ती आहेत. शिवशक्ती अनंत रुपात व्यक्त झालेल्या आहेत. सूर्य यापूर्वीही होता आणि आताही आहे. संसारामध्ये जितके काही आले आहेत तितके सर्व सूर्याच्या खाली आहेत. सूर्याला पहातच ते शेवटी देहाचा त्याग करून गेले. क्षीरसागराचे मंथन केल्यावर १४ रत्नांमध्ये चंद्र आला. लक्ष्मीचा बंधू असे त्याला म्हणतात. विश्वचक्षु या नावाने भास्कराला लहान थोर लोक जाणतात. त्यामुळे दिवाकर श्रेष्ठांत श्रेष्ठ आहे. आकाशाचा मार्गक्रमण करणे, रोज येणं जाणं अशा लोकोपकारासाठी तो काम करावे अशी त्याला समर्थाची आज्ञा आहे.
दिवस नसेल तर अंधकार होईल. सगळ्यांना काहीही समजणार नाही. दिवसेंदिवस तस्कर वाढतील. दिवाभित पक्षी वाढतील. सूर्यापुढे आणखी दुसरं कोणाला समोर आणणार? तेजो राशी सूर्याला कोणतीही उपमा देता येणार नाही. असा सूर्य रघुनाथाचा पूर्वज आहे. त्याचा महिमा अगाध आहे. मानवी वाचेला ती वर्णन करता येणार नाही. रघुनाथवंश खूप जुना पूर्वापार चालत आलेला आहे. त्यातएकाहून एक थोर झालेले आहेत. माझ्यासारख्या मतिमंदाला हा विचार काही समजत नाही. रघुनाथांच्या समुदायात सूर्याचा अंतर्भाव होतो म्हणून सूर्याचे आणि रघुनाथाचे वर्णन करण्यास मी वाक्दुर्बळ आहे. सूर्याचे दर्शन घेतल्यावर सगळ्या दोषांचा परिहार होतो. सूर्य दर्शन केल्यावर निरंतर स्फूर्ती वाढते, असं समर्थ सांगतात. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सूर्य स्तवन निरूपण नाम समास द्वितीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक सोळा समास तीन पृथ्वीस्तवन निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. पृथ्वी धन्य आहे. तिचा महिमा सांगावा तितका कमीच आहे. सगळे प्राणीमात्र तिच्या आधाराने राहतात. आकाशामध्ये जे जीव राहतात त्यांना देखील पृथ्वीचा आधार आहे. जड आधार नसला तर जीव कसे जगले असते? जाळतात पोळतात, कुदळतात, नांगरतात, उकरतात, खणतात, मळमूत्र करतात, वमन करतात नासके, कुजके सगळं पृथ्वीवर टाकतात. त्याला पृथ्वीशिवाय थारा नाही. देहांतका;ळी शरीर पृथ्वीवरच पडतं. बरं वाईट सगळं काही यांना पृथ्वी शिवाय आधार नाही. नाना धातू द्रव्य तेही भूमीच्या पोटात आढळतात. एकाचा एक संहार करणारे प्राणी भूमीवरती असतात.
भूमी सोडून कुणीकडे जातील? गडकोट, पूर, पट्टण, नाना देश हे पर्यटनाने समजतात. देव दानव मानव हे सगळे पृथ्वीवर राहतात. नारारत्न, नाना धातू, द्रव्याचे अंश गुप्त प्रगट करण्यासाठी पृथ्वीशिवाय दुसरं काहीही नाही. मेरू मंदार हिमाचल. नील निषध, विन्ध्य, माल्यवान, मलय, गंधमाधन, हेमकुट आणि हिमालय हे आठ पर्वत, नाना पक्षी, मासे, नाना सस्तन जीव हे सगळे भूमंडळावरच आढळतात. नाना समुद्राच्या पलीकडे, पाण्याचे आवरण आहे, असंभाव्य तुटलेले कडे आहेत. त्यात गुप्त विवरे आहेत. तिथे निबिडं अंध:काराने वस्ती केली आहे. मोठमोठे पाण्याचे साठे आहेत त्याचा कोणालाही पार लागत नाही. त्यात उदंड जलचर वाढले आहेत.
त्या जीवनाला पवनाचा आधार आहे. निबीड आणि दाट अशा ठिकाणी कुठेही पाणी आढळत नाही. अज्ञानरूपी कठीणता असल्याने त्यास आधार देणारी देखील पृथ्वी आहे. अशा भूगोलाच्या पलीकडचे कोणालाही जाणता येत नाही. नाना पदार्थांच्या खाणी, धातू रत्नांचे साठे, कल्पतरू, चिंतामणी, अमृताची कुंडे, नाना बेटे, नाना खंडे ही तिथे उदंड दिसतात. तिथे नाना प्रकारची वेगवेगळी जीवने आढळतात. मेरूभोवती कापलेले कडे असतात तिथे डोंगराची छायाकृती पडलेली दिसते. त्याच्या जवळच लोकालोक पर्वत आहे तिथे सूर्याचे चाक फिरते. चंद्राद्री, द्रोणागिरी, मैनाक, महागिरी पर्वत आहेत. नाना देशांत विविध प्रकारचे पाषाण आढळतात.
नाना प्रकारचे मातीचे भेद आहेत. नाना विभूती, नाना खाणी आहेत. त्यामुळे तिला बहुरत्न वसुंधरा असे म्हणतात. पृथ्वीसारखी दुसरी कोणतीही गोष्ट नाही, जेथे अफाट सैरावैरा सगळे पसरलेले आहे. सगळी पृथ्वी फिरून पाहिलं असा कोणीही प्राणी नाही, त्यामुळे धरणीशी दुसऱ्या कशाशीही तुलना होऊ शकत नाही. देशोदेशी नाना वल्ली, नाना पिके, पाहिले तर एकसारखे दुसरे नाही. असं समर्थ सांगत आहेत. हा भाग विषय समाप्त झाला असून पुढील कथा ऐकूया पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७