भावार्थ दासबोध – भाग २११

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक १६समास ६ वायु स्तवन निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. हा वायुदेव धन्य आहे. याचा स्वभाव विचित्र आहे. वायूमुळेच सगळे जीव जगामध्ये वावरतात. वायूमुळे श्वासोच्छ्वास होतो. नानाविद्यांचा अभ्यास होतो. शरीराचे चलन वलन वायूमुळे घडते. चलनवलन, प्रसारण, निरोधन, आकुंचन, प्राण-अपान-व्यान-उदान-समान वायू, नाग, कूर्म, कर्कश, देवदत्त, धनंजय असे वायूचे उदंड प्रकार आहेत. ब्रम्हांडामध्ये वायू प्रगटला. ब्रम्हांड देवतांना पुरवला गेला. तिथून पिंडामध्ये नाना गुणाद्वारे प्रगटला.

स्वर्गलोकांमध्ये सगळे देव, त्याचप्रमाणे पुरुषार्थ करणारे दानव, मृत्यूलोकी मानव आहे, विख्यात राजे आहेत. नरदेहात नाना प्रकारचे नाना भेद आहेत, अनेक प्रकारची श्वापदे आहेत, वनचरे, जलचर आहेत. ती आनंदाने क्रीडा करत असतात. त्या सगळ्यांमध्ये वायू खेळत असतो. पक्षांचे समुदाय असतात, उन्हाच्या झळा उफाळून येतात, हे वायूमुळेच घडते. मेघाचे पाण्याने भरण भरण्याचं काम वायू करतो. सगळ्यांना पिटाळतों वायूसारखा कारभारी दुसरा कोणीही नाही. शरीरातील वायू हा अंतरात्म्याच्या सत्तेत त्याच्या इच्छेनुसार वागत असतो परंतु बाहेरील व्यापक वायू स्वतंत्र असल्याने त्याच्या सामर्थ्याला उपमा नाही.

डोंगरापेक्षा मोठ्या घनदाट मेघांच्या फौजा लोकांच्या कार्यासाठी आकाशात उठतात, आकाशामध्ये वायूमुळे विजा गर्जना करतात. चंद्र सूर्य नक्षत्र माळा ग्रहमंडळ मेघमाळा ब्रम्हांडामध्ये जे काही नाना आहेत प्रकार ते सगळे वायूमुळे आहेत. ते एक केले तरी वेगळे करता येत नाहीत वेगळे केले तरी एक होत नाहीत त्याप्रमाणे हा गुंता झालेला आहे. हा वेगळा कसा करणार ते समजत नाही. जोरदार वारा सुटतो तेव्हा असंभाव्य गारा पडतात. त्याप्रमाणे जीव पाण्यामुळे निर्माण होतात. कमळाला जसा देठाचा आधार तसा जलाच्या आधाराने भूगोलाला शेषाने धरलेले असते. शेषाला पवानाचा आधार असतो. आधारामुळे त्याचं शरीर फुगतं. मग शेषाने भूमंडळाचा भार घेतला. महाकूर्माच शरीर मोठं असतं, त्याने ब्रम्हांडपालथ घातलं. त्याचे शरीर कायम राहतं ते वायूमुळे. वायूमुळेच वराह अवतारात परमेश्वराने आपल्या दातावर पृथ्वी तोलून धरली होती.

ब्रह्मा विष्णू महेश्वर चौथा आपण जगदेश्वर वायुस्वरूप आहे. असं विवेकी लोक जाणतात. तेहतीस कोटी देव आहेत. ८८ सहस्त्र ऋषी आहेत. भाराभार सिद्ध, योगी आहेत हे सगळे वायूमुळेच आहेत. नऊ कोटी कात्यायनी, ५६ कोटी चामुंडीनी, औट कोटी भूतखाणीही वायूमुळे आहेत. भुते, देवते, नाना शक्ती वायुरूप असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. कितीतरी नाना जीव भूमंडळवर आहेत. पिंडी ब्रह्मांडी वायू पुरून उरला आहे. बाहेरून त्याचेच आवरण आहे. असा सगळ्यांच्या ठाई समर्थ असा वायू पुरून उरला आहे. असा समर्थ पवन आहे. त्याचा हनुमंत हा नंदन आहे. हनुमानाचे तन मन रघुनाथ स्मरणात गुंतलेले आहे. हनुमंत हा वायूचा प्रसिद्ध पुत्र आहे. पिता आणि पुत्रामध्ये भेद नाही. दोघेही पुरुषार्थात सारखेच आहेत.

हनुमंताला प्राणनाथ असं म्हणतात. असा हा गुणांनी समर्थ आहे. प्राणाशिवाय सगळं व्यर्थ आहे. मागे हनुमंताच्या मागे मृत्यू आला होता तेव्हा वायूने त्याला रोखून धरले होते. तेव्हा सगळ्या देवांची अवस्थाही प्राणांतिक झाली होती. तेव्हा सगळे देव एकत्र आले त्यांनी वायूचे स्तवन केलं मग वायु प्रसन्न होऊन त्यांनी मोकळा केला. असा प्रतापी थोर हनुमंत आहे. तो ईश्वराचा अवतार आहे. त्याचा पुरुषार्थ सगळे देवगण पाहतच राहिले. देव कारागृहामध्ये होते ते हनुमंताने पाहिले आणि मग त्याने लंकेभोवती संहार करून त्यांना बाहेर काढलं. देवांना दिलेल्या कष्टाचं त्याने उट्टे काढलं. त्यामुळे या शेपटीधारकाचे मोठं कौतुक आणि आश्चर्य लोकांना वाटतं. रावण सिंहासनावर होता तिथे जाऊन त्याने ठोसा मारला. लंकेमध्ये विरोध केला. त्यामुळे देवाला त्याचा आधार वाटला. मोठा पुरुषार्थ पाहिला. मनामध्ये रघुनाथाविषयी करुणा त्याने बाळगली. सगळ्या दैत्यांचा संहार केला. सगळ्या देवांना सोडवलं आणि त्रैलोक्यातील प्राणिमात्रांना सुखी केलं. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे वायू स्तवन निरूपण नाम सहावा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!