दशक सात समास ६ बद्धमुक्त निरूपण
जय जय रघुवीर समर्थ. या ठिकाणी अनुभव मुख्य आहे बाकी सगळे निरर्थक आहे आपल्या स्वतःच्या अनुभवाने आपण तृप्ती मिळवावी. एखादा गळ्यापर्यंत जेवण करतो त्याला भुकेला म्हटलं तर तो त्रासेल. देह हे आपले स्वरूप नाही तिथे संदेह कशासाठी पाहिजे? बद्ध आणि मुक्त हा भाव देहाकडेच येतो. देहबुद्धी धरून, मी पण शिल्लक ठेवून ब्रह्मचिंतन करणारे ब्रह्मादिक असले तरी ते मुक्त नव्हेत. तेथे शुक देखील अपवाद नाही. मुक्तपणा हेही बंधन आहे, मुक्त बध्द म्हणणे अज्ञानी पणा होय, सस्वरूप सिद्ध झालेले बध्द नसतात आणि मुक्त देखील. पोटाला मुक्तपणाचा दगड बांधला तर तो पाताळात जाईल. देहबुद्धीचा अडसर स्वरूपा पर्यंत पोहोचू देत नाही.
मीपणापासून सुटला तोच एक मुक्त झाला. मग तो बोलला, नाही बोलला तरी तो मुक्त.ज्याला बंधन वाटतं तो कसा काय मुक्त होईल? त्यामुळे जो परमशुद्ध तत्वज्ञानी आहे त्याला बंध-मुक्त असं काही नाही. मुक्तता आणि बंधन हा मायेमुळे निर्माण झालेला एक विनोद आहे. जिथे नामरूप हे संपते तिथे मुक्तपण कस काय उरेल? बद्ध आणि मुक्त हेदेखील विसरलं जातं. मुक्त कोण झाला? तो आपण की आणखी कोण? हे ज्याचे त्याने जाणावे. हे बंधन तसा विचार करणाऱ्यास बाधक ठरते. बाकी हा सगळा भ्रम आहे, अहंकारामुळे हे श्रम होतात. मायेच्या पलीकडे गेलेला आहे त्याला खरी विश्रांती मिळते. बद्धता आणि मुक्तता ही केवळ कल्पना आहे तरीदेखील ही कल्पना तरी कोठे खरी आहे? म्हणून हे मृगजळ आहे. मायेने व्यापलेला मनुष्य जागृतीला आला की स्वप्न मिथ्या ठरते तसे हे आहे. स्वप्नामध्ये बद्ध-मुक्त झाला तो जागृत झालेला नाही. तो कोण, काय झाला हे काही समजत नाही. म्हणून ज्यांना आत्मज्ञान झाले ते जगातले सगळे जण मुक्त आहेत.
शुद्ध ज्ञान झालं तो खरा मुक्त आहे. बद्धमुक्त हा संदेह म्हणजे कल्पनेचा देह होय. साधू हा नेहमी निसंदेह देहाच्या पलीकडे गेलेला वस्तू असतो. आता पुढे श्रोत्यांनी कसे राहावे, त्याचे निरुपण करतो ते सावधपणे ऐकावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बुद्ध मुक्त निरूपण नाम समास षष्ठ समाप्त.
दशक ७, समास सातवा साधन प्रतिष्ठा
जय जय रघुवीर समर्थ. वस्तूची कल्पना करावी तर ती निर्विकल्प आहे. तिथे कल्पनेच्या नावाने शून्य आढळते. तरीही कल्पना केली कल्पनेच्या हाती येत नाही. तिची ओळख पटत नाही, चित्त भ्रांतीमध्ये सापडते. डोळ्यांनी काही दिसत नाही, मनाला काही भासत नाही, जे दिसतही नाही आणि भासतही नाही ते कस ओळखायचं? निराकार पाहायला गेलं तर मन शुन्य आकार पाहते. असं वाटतं की सगळीकडे अंधार भरलेला आहे. कल्पना केली तर ब्रह्म काळे आहे ,पण ब्रह्म काळे नाही की पिवळे नाही. लाल नाही की पांढरे नाही. ते रंगरहित आहे. ज्याला काही वर्ण नाहीये, व्यक्तिमत्त्व नाहीये, भासापेक्षा वेगळे आहे,
त्याला रूप नाही, ते कसे ओळखायचे? हे तर विनाकारण श्रम घेण्यासारखे आहे. जे निर्गुण, गुणातीत, अदृश्य, अव्यक्त आहे. चिंतनाच्या पलीकडले परमपुरुष आहे. अचिंत्य असलेल्याचे चिंतन करायचे, अव्यक्त आठवायचे आणि निर्गुणाला कसे ओळखायचे? डोळ्यांनी दिसत नाही, मनाला सापडत नाही त्या निर्गुणाला कसं पाहायचं? असंगाचा संग धरणे, निराधार आकाशामध्ये वास करणे, निशब्दाचा अनुवाद कसा करायचा? अचिंत्य बाबीचे चिंतन केले, आणि निर्विकल्पाची कल्पना केली, अद्वैताचे ध्यान केले तर द्वैतच समोर येते. आता ध्यान सोडायचं, अनुसंधान मोडायचं, तरी पुन्हा संशय निर्माण होतो. असा गहन प्रश्न समर्थ विचारीत आहेत. या प्रश्नाचे उत्तर ऐकू या पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७