दशक ७ समास ८ श्रवण साधना
जय जय रघुवीर समर्थ. नाना नाना देश नाना भाषा, नाना मते भूमंडळावर आहेत. सर्वांना श्रवणासारखे साधन नाही. श्रवणामुळे उपरती घडते, बद्ध असतात ते मुमुक्षु होतात, मुमुक्षु असतात ते साधक होतात, नियमांचे पालन करतात ते साधकाचे सिद्ध होतात, हे सगळ्यांना ठाऊक आहे. अत्यंत दुष्ट, चांडाळ देखील पुण्यशील होतात. श्रवणाचा तात्काळ गुण येतो. दुर्बुद्धी दुरात्मा देखील पुण्यात्मा होतो असा श्रवणाचा महिमा आहे.
तीर्थ व्रतांच्या फलश्रुतीत ‘पुढे होईल’ असे सांगतात पण श्रवणाचे तसे नाही, ते ऐकल्यावर लगेच समजतं. नाना रोग, नाना व्याधी त्यासाठी तुम्ही औषधी तोडतात त्याप्रमाणे श्रवणसिद्धी आहे असे अनुभवी लोक जाणतात. श्रवणामुळे विचार कळतात त्यामुळे भाग्यश्री प्रगट होते, मुख्य परमात्माच स्वानुभवातून समजतो. मनन म्हणजे अर्थावर लक्ष केंद्रित करणे. ते केले असता निजध्यासाने समाधान होते. बोलण्याचा अर्थ समजला तरच समाधान होते आणि मनामध्ये संदेह राहत नाही. अंतरात पूर्ण निसंदेहता येते. संदेह हे जन्माचे मूळ आहे, ते श्रवणामुळे नाहीसे होते आणि त्यामुळे पुढे प्रांजळ समाधान मिळते.
जिथे श्रवण, मनन नाही तिथे कसलं समाधान? मुक्तपणाचे बंधन पायामध्ये घालून घेतल्यासारखं आहे. मुमुक्षु, साधक किंवा सिद्ध हे श्रवणाशिवाय बांधले गेलेले आहेत, श्रवण केल्यानेच चित्तवृत्ती शुद्ध होतात. जिथे श्रवण नाही ते विचित्र जाणावे. साधकाने तिथे एक क्षणही थांबू नये. जिथे श्रवणस्वार्थ नाही तिथे कसला परमार्थ? मागे केलेले देखील श्रवण नसेल तर व्यर्थ जाईल. त्यामुळे श्रवण करावे, साधन मनात धरावे, नित्य नेम पाळून संसार सागरातून तरावे. आपण रोज जेवण करतो, पाणी पितो, त्याप्रमाणे श्रवण मनन केलेच पाहिजे. आळसाने जो नर श्रवणाचा अनादर करतो त्याचे स्वहिताचे नुकसान होते. आळसाचे संरक्षण म्हणजे परमार्थ बुडवणे त्यासाठी श्रवण केले पाहिजे. आता श्रवण कसे करावे? कुठल्या पंथाला पहावे हे पुढल्या समासात सर्व सांगत आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रवण निरूपण नाम समास अष्टम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ जय जय रघुवीर समर्थ
दशक ७ समास ९ श्रवण कसे करावे
जय जय रघुवीर समर्थ. आता श्रवण कसे करावे तेही सर्व सांगतो, श्रोत्यांनी एकचित्ताने लक्ष द्यावे. एखादे वक्तृत्व कानावर पडले, त्याच्यामुळे झालेले समाधान नाहीसे होते. त्यामुळे मायेने भरलेल्या वक्तृत्वाचा त्याग करावा. तिथे निश्चयाच्या नावाने शून्य दिसते. एका ग्रंथाचा निश्चय केला, दुसऱ्याने उडवला त्यामुळे संशय वाढला. जिथे संशय दूर होतो, शंका निवृत्ती होते अशा प्रकारचे आद्वैत ग्रंथ परमार्थ्याने श्रवण करावे. मोक्षाचा अधिकारी आहे तो परमार्थ पंथ धरतो. त्याला आतमधून अद्वैत ग्रंथाची प्रीति जडते. ज्याने इहलोक सोडला, जो परलोकींचा साधक आहे, त्याने अद्वैत शास्त्रातील विवेक पहावा. ज्याला अद्वैत पाहिजे, त्याच्यापुढे द्वैत ठेवले की त्या श्रोत्याचे चित्त विचलित होते. आवडीसारखे मिळाले की सुख उचंबळून येते, मनाला कंटाळा येत नाही, नाहीतर मग कंटाळा येतो. ज्याची जशी उपासना असेल तसे त्याला प्रीती वाटते. त्याची दुसऱ्याशी तुलना करणे प्रशस्त वाटत नाही. श्रवण कसे करावे हे समर्थ सांगत आहेत. अधिक माहिती ऐकू या पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे