दशक ८ समास ३ सूक्ष्म आशंका नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. जसे वायूचे रूप आहे तसेच मूळमायेचे आहे. ते भासते परंतु प्रत्यक्ष दाखविता येत नाही. वारा खरा आहे असं म्हटलं तरी तो दाखविता येत नाही, त्याच्याकडे पाहायला गेले तर धुळच दिसते. तशी मूळमाया भासते परंतु दिसत नाही. पुढे माया अविद्या विस्तारलेली असते. वायुमुळे ढग आकाशामध्ये उडताना दिसतात त्याप्रमाणे मूळमायेच्या योगाने जग हालचाल करताना दिसते.
आकाशामध्ये आभाळ नव्हते, नंतरही असणार नाही, पण अचानक येते त्याप्रमाणे मायेच्या गुणामुळे जग दिसत आहे. पण त्या आभाळामुळे आकाशाची स्थिरता गेली असे वाटते; पण आकाश तर जसे आहे तसेच असते; त्याप्रमाणे मायेसाठी निर्गुण हे सगुण झाल्यासारखे वाटते परंतु ते जसे असते तसेच असते. आभाळ आलं आणि गेलं तरीसुद्धा आकाश तिथेच आहे त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माला कोणतेही गुण चिकटत नाहीत. आभाळ हे नुसते दिसते पण आकाश तसेच असते तसे निर्गुण ब्रह्म आहे. वर पाहिले तर आकाश दिसते आणि आकाश निळे दिसते परंतु हा निळा रंग देखील मिथ्याभास आहे.
आकाश पालथे घातल्यासारखे दिसते, चारी बाजूना धरतीला मिळालेले दिसते. त्याने विश्वाला कोंडले असे वाटते मात्र ते मोकळेच आहे. पर्वत देखील निळा दिसतो परंतु तो लांबून दिसणारा रंग आहे, जवळ गेल्यावर तसे दिसत नाही तसेच निर्गुण ब्रह्म आहे. रथामध्ये बसलेले असताना पृथ्वी चंचल वाटते परंतु ती निश्चल असते; त्याप्रमाणे परब्रह्म निर्गुण जाणावे. आभाळामध्ये चंद्र धावताना दिसतो परंतु हे अवघे मायिक आहे. अग्नीच्या झळा, किंवा ज्वाला वातावरण कापताना दिसतात. पण वातावरण निश्चलच असते. त्याप्रमाणे स्वरूप हे गुणात्मक झाले असे वाटते परंतु हे कल्पनेचे इमले आहेत, ते खोटे आहेत. दृष्टीबंधनाचा खेळ असतो तशी माया ही चंचल आहे, ब्रह्म हे शाश्वत आणि निश्चल आहे.
अशाप्रकारे ब्रम्ह निरवयव म्हणजे कोणतेही अवयव नसणारे आहे तर माया हालचाल दाखवते, असा तिचा स्वभाव आहे. माया मुळी नाहीच परंतु ती खऱ्यासारखी वाटते. आकाशामध्ये ज्याप्रमाणे अभ्र येतात आणि जातात त्याप्रमाणे अशी माया उद्भवते आणि निघून जाते. वस्तू मात्र जशीच्या तशीच आहे. एकोहम् बहुस्याम म्हणजे माया ही सर्व घडवते अशी स्फूर्ती तर निर्गुण काहीच करत नाही. पण ब्रह्म आहे म्हणूनच हा उद्भव-विलय होत असतो. प्रत्यक्ष ब्रह्म स्वरूपात काहीच बदल होत नसतो. दृष्टी फिरवल्यावर सेना असल्यासारखां भास झाला, परंतु तिथे फक्त आकाशच असते. असा मायेचा खोटा खेळ असून तिथे तत्व काही नसते. मूळमायेतच तत्व आहेत. वस्तूचे चंचलत्व हाच ओंकार हा अर्थ ज्ञानी लोक जाणतात.
मूळ माया हलते हे वायूचे लक्षण आहे, मात्र सूक्ष्म तत्त्व हे दिसत नाही. अशा प्रकारे पंचमहाभूते ही पूर्वी अव्यक्त होती, पुढे ती सृष्टीरचनेमध्ये व्यक्त होतात. मूळमायेचे लक्षण म्हणजे पंचभौतिकता. त्याची ओळख सूक्ष्मदृष्टी असल्यासच पटू शकेल. अशा तऱ्हेने सूक्ष्मआशंका निरसन समर्थ करीत आहेत. पुढील निरसन ऐकू या पुढील भागात.जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७