भावार्थ दासबोध – भाग ११३

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक ८ समास ४ सूक्ष्म पंचभूते निरुपण नाम समास  
जय जय रघुवीर समर्थ. वायू आणि आकाशामध्ये भेद दिसत नाही. वायू आकाशाइतकाच स्तब्ध दिसतो, परंतु तो आकाशाला विरोध करतो. आकाशामध्ये आकाश मिसळले असं बोलता येणार नाही पण अशा प्रकाराने आकाश हे  पंचमहाभूतांपैकी एक आहे. वायूमध्ये पंचभूते कशी असतात तेही एकचित्ताने ऐकावे. वायु हळूवार असतो, इतका की कधी कधी त्याला फूलही जड वाटतं. तर कधीकधी इतका जोरात वाहायला लागतो की मोठमोठी झाडे देखील कडकडा मोडत उन्मळून पडतात.

वायूला वजन नसते तर हे घडले नसते. वायूची ही शक्ती हेच त्याचे काठिण्य म्हणून तोच पृथ्वीचा अंश आहे. इथे श्रोते शंका घेतात, झाडे नसली तरी वायूत शक्ती असते ती कठीण आहे. अग्नीचा स्फुल्लिंग हा लहान असतो, सूक्ष्मरूपाने त्याची ठिणगी पडते, ती उष्ण असते, तसे सूक्ष्मात जडपणा सूक्ष्म रूपात असतो. मृदुपणा म्हणजे पाणी, तेजाचे स्वरूप आग आहे आणि वायू हा सहजपणे चंचल आहे. सगळ्यांमध्ये मिसळलेले हे आकाश किंवा पोकळी आहे आणि पंचभूताचे अंश वायूमध्ये देखील आलेले दिसतात. आता ते जे आहे त तेज देखील उग्र होऊ शकते आणि पृथ्वीचे गुणधर्म त्याच्यामध्ये येऊ शकतात. दिसताना पाणी  मृदू वाटते परंतु ते तेजाला विझवते, म्हणजे त्याच्यात देखील तेज आहे हे सांगायला नको.

तेजामध्ये चंचल वायू आहे, तेजामध्ये निश्चल आकाश आहे. तेजात अशाप्रकारे सर्व पंचभूते आहेत. आता पाण्याचे पहा, मृदुपण म्हणजे पाणी. त्यात तेज मृदुपणे वास्तव्य करते. तर वायू हा मृदूत्वात स्तब्ध झालेला असतो. आकाश हे व्यापक असते हे सांगायला नकोच. पाण्यात पंचभूत कशी असतात ते सूक्ष्मपणे सांगितले.  आता पृथ्वीचे लक्षण सांगतो, पृथ्वी कठीण असली तरी तिच्यातील मृदुपणा म्हणजे पाणी. तेजातील कठीणपणाचा भास म्हणजे तेजाचा प्रकाश आणि त्याला कठीणपणे  अटकाव करतो, तो म्हणजे वायू. आकाश सगळ्यांना व्यापक आहे हा एक उघड  विचार आहे, आकाशामध्येच सगळं काही भासते. तोडण्याचा प्रयत्न केला तरी आकाश तोडता येत नाही. फोडल तरी फुटत नाही. आकाश तिळमात्र देखील कमी-जास्त होऊ शकत नाही. आता पृथ्वीपर्यंत सर्व भुतांची माहिती दिली. एका भूतांमध्ये पंचभुतही राहतात हे देखील सांगितलं. पण वरवर पाहता ते काही कळत नाही मनामध्ये संदेह निर्माण होतो भ्रांतीमुळे अहंकार वाढतो.

सूक्ष्म दृष्टीने पाहता सर्वत्र  वायूच दिसतो, त्याचा अधिक शोध घेतला की, पंचभूते दिसतात.  अशाप्रकारे पंच भुतांमध्ये पवन ही एक मूळमाया आहे. माया आणि सूक्ष्म त्रिगुण हेदेखील पंचमहाभूते आहेत. भुतांनी गुण एकत्रच केले त्याला अष्टधा म्हणतात.  अष्टधा प्रकृती ही पंचमहाभूतात्मक आहे, शोधल्याशिवाय त्याबाबत संदेह धरणे मूर्खपणाचे हे. त्याची ओळख सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यावर होते. गुणांपासून जी भुते  स्पष्ट दशेला आल्यावर ती जडत्व होऊन तत्व झाली. पुढे तत्त्व पिंड-ब्रह्मांड रचना होऊन ते दिसतं त्यालाच पंचमहाभूतांचे मिश्रण असे म्हणतात. ते बुद्धीगम्य तर्काने सांगितले. त्याच्या आधी ब्रह्मगोल  निर्माण झाला होता.

त्या ब्रम्हांडापलीकडच्या गोष्टी आहेत. त्या वेळी सृष्टी निर्माण झालेली नव्हती. ती मूळमाया सूक्ष्म दृष्टीने ओळखावी.पंचमहाभूते, अहंकार, आणि महत्त्तत्व अशा सातांचा मिळून ब्रह्मांड  गोल तयार होतो, त्याला माया अविद्येचे बंड असे म्हणतात. ब्रह्मांड निर्माण झालेले नव्हते तेव्हा ते निर्माण झाले आहे. ब्रह्मा विष्णू महेश्वर हा अलीकडचा विचार आहे. त्याच्या अलीकडे पृथ्वी, मेरू सप्त सागर येतात अशी गुंतागुंतीची रचना समर्थ स्पष्ट करून सांगत आहेत. पुढील कथा ऐकू यापुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.