दशक आठवे समास सहावा दुश्चित निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. प्रज्ञावान शिष्यास मुक्ती मिळण्यास वेळ लागत नाही. त्याला तात्काळ मुक्ती लाभते. प्रज्ञावंत आणि अनन्यभक्त असेल तर त्याला एक क्षण देखील पुरेसा आहे. अनन्यभाव नसेल तर नुसती बुद्धी असली तरी तिचा उपयोग नाही. प्रज्ञशिवाय अर्थ समजत नाही, विश्वास असल्याशिवाय वस्तू समजत नाही. प्रज्ञा आणि विश्वास यांच्यामुळे देहाभिमान गळून पडतो. देहाभिमान संपल्यावर सहजपणे वस्तूंची प्राप्ती होते.
सत्संगामुळे सद्गती ताबडतोब मिळते तिथे विलंब नाही. सावध, साक्षेपी, विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास असलेल्यांना साधनेसाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. इतर भोळेभावडे भाविक असतातत्यांना देखील साधन केल्यानंतर मोक्ष मिळतो. साधूच्या संगतीने मात्र तात्काळ मोक्ष मिळतो आणि त्यांची कुंडलिनी जागृत होते. काहीही असलं तर माणसाने साधन सोडू नये. निरुपणाचा उपाय करीत राहावा. निरूपणामुळे सगळ्यांची सोय होते. आता मोक्ष कसा आहे? स्वरूप म्हणजे काय? त्याची काय अवस्था आहे? त्याचा भरवसा सत्संगामुळे कसा मिळतो? त्याचं निरूपण आहे ते पुढे सांगत आहे.
श्रोत्यांनी शांतपणाने तिकडे लक्ष द्यावे. अवगुण सोडण्यासाठी न्यायनिष्ठुर कठोर बोलावं लागतं परंतु श्रोत्यांनी अशा वचनांचा राग मानू नये, असं समर्थ सांगत आहेत. इतिश्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे दुश्चित निरूपणनाम समास षष्ठ समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक आठ समास सात मोक्ष लक्षण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. मागच्या समासामध्ये श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता की किती दिवसात मोक्ष मिळतो? त्याची कथा श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावी.मोक्षाला कसे जाणायचं? मोक्ष कशाला म्हणायचं? संतांच्या सहवासामुळे मोक्ष कसा मिळवायचा? असे प्रश्न इथे उपस्थित होतात. त्याचे उत्तर देतो. बद्ध म्हणजे बांधला गेलेला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झालेला. तो संतांच्या सहवासामुळे कसा मिळतो तेही ऐका. प्राणी संकल्पामुळे बांधला जातो. जीव असल्यामुळे बद्ध होतो. तो साधू लोक विवेक द्वारे मुक्त करतात. मी जीव असा युगानुयुगे संकल्प दृढ करीत गेल्याने प्राणी अल्प बुद्धीचा होतो.
मी जीव आहे मला बंधन आहे, मला जन्म मरण आहे, मी आता केलेल्या कर्माचं फळ भोगीन, पापाचे फळ दुःख आहे आणि पुण्याचे फळ सुख आहे, पाप फेडणे आवश्यक आहे. पापपुण्य भोग सुटत नाही आणि गर्भवास तुटत नाही अशी ज्याची कल्पना दृढ झालेली आहे तो जीवपणामुळे बद्ध झालेला आहे. त्यांनी स्वतःच रेशमाच्या किड्या प्रमाणे स्वतःला कोषात अडकवून घेतलेले आहे. त्यातच तो मृत्यू पावतो. भगवंताचे ज्ञान नसलेला अज्ञानी असतो. त्याचं जन्म मरण सुटत नाही. आता काहीतरी दान करू, पुढच्या जन्माला आधार होईल, त्याच्यामुळे संसार सुखरूप होईल, पूर्वी दान केले नाही म्हणून दारिद्र्य आले, आता तरी काहीतरी करायला पाहिजे; म्हणून जुनं वस्त्र दिलं आणि एक तांब्याचं नाणं दिलं आणि म्हणाला मला आता याच्या पुढच्या वेळेस कोटी पटींनी लाभ मिळेल.
कुशावर्तामध्ये, कुरुक्षेत्रामध्ये असा महिमा ऐकून दान करतो आणि कोटी कोटी पटीने मला मिळेल अशी आशा करतो. पैसा किंवा दमडी दान केली आणि एखाद्या भिकाऱ्याला तुकडा घातला, जेवायला घातलं आणि म्हणे मी कोटी कोटी तुकड्यांचे पुण्य तयार केलं आता मी पुढच्या जन्मी ते उपभोगीन. अशा प्रकारची कल्पना करून घेतो. अशा तऱ्हेने जन्म कर्मामध्ये प्राण्याची वासना गुंतते. आता मी जे देईल ते पुढच्या जन्मी मला परत मिळेल अशी कल्पना करतो तो अज्ञानी बद्ध जाणावा.
अनेक जन्माचे शेवटी नरदेहाची प्राप्ती होते. इथे ज्ञान जर नसेल तर सद्गती मिळत नाही. गर्भवात चुकत नाही. नार्देहाला केवळ गर्भवासच घडतो असं नाही तर अकस्मात नीच योनी देखील भोगावी लागते. शास्त्रामध्ये याची माहिती दिलेली आहे. संसारामध्ये नरदेह परम दुर्लभ आहे. पाप, पुण्य, समता घडते तेव्हाच कुठेतरी नरदेह मिळतो. नाहीतर असा जन्म मिळत नाही असं व्यासांनी भागवतामध्ये म्हटलेलं आहे. नरदेह दुर्लभ तिथे थोड्याशा संकल्पने तुम्हाला लाभ मिळतो.
आपला गुरु चांगला असेल तर सहजसुख देतो. दैव अनुकूल नसेल, स्वतः पापी असेल, त्या प्राण्याला भवसागर तरुन जाता येत नाही त्याला आत्महत्यारा म्हणावे. ज्ञान नसलेल्या प्राण्यांना जन्म मृत्यू ८४ लक्ष योनी भोगाव्या लागतात, तितक्या त्याने आत्महत्या केल्या असं होतं म्हणून त्याला आत्महत्यारा म्हणतात. अशा तऱ्हेने ही माहिती समर्थ देत आहेत.पुढील माहिती ऐकू या पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे