

निरुपण : पद्माकर देशपांडे
दशक आठ समास ९ सिद्धांची लक्षणे जय जय रघुवीर समर्थ. साधकाचे लक्षण सिद्धाच्या अंगी देखील दिसते. साधक असल्याशिवाय सिद्धाचे लक्षण बोलूच नये. बाहेरून साधकासारखा दिसतो आणि आतून स्वरूपाशी एकरूप झालेला असतो असे सिध्दाचे लक्षण चतुराने जाणावे. संदेह नसलेले साधन हे सिद्धाचे लक्षण एझे. कधीही नष्ट न होणारे अंतरबाह्य समाधान हे आणखी एक लक्षण. अशी आंतरस्थिती अचल झाली तेथे कोणतीही गती नाही.
वृत्ती स्वरूपाला लागल्यावर स्वरूपच होऊन जाते. त्या स्थितीमध्ये देहाची हालचाल होत असली तरी तो निश्चल असतो आणि निश्चल असला तरी देह चंचल असतो. स्वरूपी स्वरूपचं झाला मग तो पडूनच राहिला किंवा उठून पळाला तरी त्याची आतील स्थिती कायम राहते, कारण तो अंत:करणापासून निवृत्त झालेला असतो त्याचे मन भगवंतापाशी जडलेले असते तोच खरा साधू. बाहेरून कसाही दिसला तरी त्याचं मन परमेश्वराच्या ठाई लागलेलं असतं हे लक्षण साधूच्या अंगी दिसते. अकस्मातपणे राज्यावरती बसला तरी त्याच्या अंगावर राजाचे तेज दिसते त्याप्रमाणे स्वरूपाची ओढ निर्माण झाल्यानंतर जिव्हाळा आणि प्रेम त्याच्यामध्ये दिसते. अन्यथा अभ्यास केला नाही तर काही हाती लागत नाही. त्यामुळे स्वरूप होऊन राहावे. अभ्यासाचा मुकुटमणी असला तरी वृत्ती निर्गुण ठेवावी. संतांच्या सहवास, निरूपण सुरु ठेवावे. अशा तऱ्हेची लक्षणे ही अभ्यासावी. या स्वरूपापासून दूर झाल्यावर गोसावी भ्रष्ट होतात. आता हे बोलणे राहू द्या. साधूची लक्षणे ऐका. ज्यामुळे साधकाच्या अंगामध्ये समाधान निर्माण होते. स्वरूपाचीच कल्पना केल्यावर कोणतीही कामना उरत नाही म्हणून साधूजनांना काही कामच नसते.
कल्पना केलेला विषय हातातून निघून गेल्यावर क्रोध यावा असे घडत नाही त्यामुळे साधूजनांचा अक्षय ठेवा जाणार नाही म्हणून ते क्रोधरहित असतात. ते संत असतात त्यांनी नाशवंत पदार्थांचा मोह सोडलेला असतो. इथे दुसरं काही उदाहरणच नाही कोणावर रागावणार? सगळ्या चराचरामध्ये क्रोधरहीत असे साधूजन वर्तन करतात. आपल्या स्वानंदामध्ये असतात त्यामुळे कोणताही गर्व करीत नाहीत व कोणाशी वादविवाद करत नाहीत. साधूचे स्वरूप निर्वेर असते त्यामुळे त्यांना तिरस्कार नसतो. आपणच आपले असल्याने मत्सर कोणाचा करायचा? साधू हे ब्रह्मरूप झालेले असल्याने त्यांना मत्सराचे वेड नसते. साधूचे स्वरूप स्वयंभू असते तिथे द्वैताचा आरंभ झालेला नसतो त्यामुळे त्यांना दंभ नसतो. जिथे दृश्यच नाहीसे झाले तिथे प्रपंच कसला? म्हणून साधू हा प्रपंच विरहित असतो.
अवघे ब्रम्हांड हे त्याचे घर असते. पंचभौतिक पसारा खोटा असल्याचे जाणून त्याने त्याचा त्याग केलेला असतो. त्यामुळे तो निर्लोभ असतो. त्याची वासना शुद्ध स्वरूपामध्ये समरस झालेली असते. तो स्वतःच स्वतःचा असल्यामुळे स्वार्थ कोणाचा करायचा? म्हणून तो शोकरहित असतो. नाशवंत दृश्य सोडून त्याने शाश्वत स्वरूप सेवन केलेले असते त्यामुळे शंकारहित असतो. साधू हा निवृत्त असल्यामुळे तो शोकरहित असतो, तसेच दुसऱ्याला देखील दुखवित नाही. मोहामुळे मन पछाडले जाते त्यामुळे ते विपरीत वर्तन करते पण साधू तर उन्मन झाल्याने मोहातीत असतो. साधू म्हणजे अद्वय वस्तू. त्यामुळे त्याला कसलही भय वाटत नाही. परब्रम्ह हे निर्भय असतं तोच साधू ओळखावा. यामुळे साधू हा भयाच्या पलीकडे गेलेला, निर्भय निवांत असतो. सगळ्याचा अंत झाला तरी साधू अनंतरूप असतो, असं साधूचं वर्णन समर्थ करीत आहेत. अधिक माहिती ऐकू या पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७

