भावार्थ दासबोध -भाग १२५

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक आठवे समास दहावा शून्यत्व निरसन नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. एक म्हणतात देव ब्राह्मणांचे पूजन करावे कारण ते विश्वजनाचे मायबाप नारायण आहेत. एक म्हणतात, शास्त्र पाहावं त्याच्यामध्ये देवाचे वर्णन आहे ते वाचून त्याप्रमाणे परलोकाला जावे. एक म्हणतात अहो लोकांना शास्त्र पाहून काही समजत नाही, त्यामुळे साधूना शरण जावे. एक म्हणतात, सगळ्या गोष्टी सोडून द्या. उगीचच वटवट कशासाठी करता? सर्वांमध्ये  भूतदया असावी. एक म्हणतात आपला आपल्या आचार विचार चांगला असावा,

अंतकाळी सर्वोत्तमाचे देवाचं नाव घ्याव. एक म्हणतात, पुण्य असेल तरच मुखात नाम येईल, नाहीतर भूल पडेल. एक म्हणतात जिवंत असतानाच सार्थक करावं, एक म्हणतात तीर्थाटन करीत फिरावं. एक म्हणतात तीर्थस्थान म्हणजे काय नुसतं आपलं पाणी आणि पाषाणाची भेट! गंगेत बुड्या घेऊन कशाला दुःखी व्हायचे?  एक म्हणतात वाचाळपणा सोडून द्या, देवाच्या दर्शनाने महापातकांची होळी होते. एक म्हणतात मनच तीर्थस्वरूप असल्याने मन आवरावे. एक म्हणतात सावकाश कीर्तन करावे. एक म्हणतात योग चांगला तो अंगीकारावा आणि देह अमर करून घ्यावा. एक म्हणतात काळ घालवू नये,भक्ती मार्गाची सोय धरावी. एक म्हणतात ज्ञान चांगले. एक म्हणतात साधन करावे.

एक म्हणतात निरंतर मुक्त असावे. एक म्हणतात पापाचा कंटाळा धरावा, एक म्हणतात आमचा मार्ग मोकळा आहे. एक म्हणतात निंदाद्वेष करू नये. एक म्हणतात सावकाशपणे दृष्टांची संगत त्यागावी. एक म्हणतात ज्याचं खावं त्याच्या समोरच मरावं त्यामुळे तात्काळ मोक्षपद मिळतं.एक म्हणतात सगळ्या गोष्टी सोडून द्या, आधी रोटी पाहिजे पोळी पाहिजे मग बाकीची बडबड करा. एक म्हणतात पाऊस असावा, मग योग करा कारण दुष्काळ पडला नाही म्हणजे बरं. एक म्हणतात, तपोनिधी झालं तर सगळ्या सिद्धी मिळतील. एक म्हणतात आधी इंद्रपद मिळवावे. एक म्हणतात तंत्रशास्त्र पाहावे. वेताळाला प्रसन्न करून घ्यावे त्यातून देव साधावा आणि स्वर्गात जावे. एक म्हणतात अघोर मंत्र घ्यावा त्यामुळे स्वतंत्र होईल. एक म्हणतात जिचा आधार श्रीहरी आहे ती लक्ष्मी तिची प्रार्थना करा ती म्हणजे सगळं करेल. लक्ष्मी म्हणजे धर्म तिथे बाकीचे क्रियाकर्म काही कामाचे नाही. तर एक म्हणतात तिच्या गर्वामुळे कुकर्म होतात. एक म्हणतात प्रयत्नपूर्वक मृत्युंजयाचा जप करावा त्यामुळे सगळे संकल्प सिद्धीस पावतात.

एक म्हणतात बटू भैरवाची पूजा करा म्हणजे वैभव मिळेल. एक म्हणतात झोटिंग सर्व पुरवतो.एक म्हणतात काळी कंकाळी, एक म्हणतात, भद्रकाली. एक मिनिटात उच्छिष्ट चांडाळी सहाय्य करील. एक म्हणतात, विघ्नहर. एक म्हणतात भोळा शंकर. एक म्हणतात भगवती लगेच पावते. एक म्हणतात मल्हारी ताबडतोब भाग्य देतो. एक म्हणतात व्यंकटेशाची भक्ती चांगली. एक म्हणतात प्रारब्ध, एक म्हणतात, प्रयत्न करावा. एक म्हणतात देवावर सगळा भार टाकावा. एक म्हणतात, देव कसला भल्याभल्यांचा अंत पाहतो. एक म्हणतात, हा युगाचा युगधर्म आहे, एक आश्चर्य मानतात, एक विस्मय करतात, एक कंटाळून म्हणतात काय होईल ते पहावे. असे प्रापंचिक लोक अनेक लक्षणे सांगतील. त्याचे वर्णन करावे तितके थोडेच. पण त्यांच्यापैकी काही थोडी सांगितली. असं समर्थ म्हणतात. हा भाग इथे समाप्त झाला. पुढील कथा ऐकूया पुढील भागात.जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.