भावार्थ दासबोध -भाग १२६

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक आठ समास दहा शून्यत्व निरसन नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. ज्याला ज्ञान झाले आहे त्यांचा अनुभव कसा असतो ते सांगतो. लक्ष देऊन ऐका. एक म्हणतात, भक्ती करावी म्हणजे श्रीहरी सद्गती देतो. एक म्हणतात, कर्मामुळे ब्रह्माची प्राप्ती होते. एक म्हणतात, भोग सुटत नाहीत, जन्म मरण तुटत नाही. एक म्हणतात, अज्ञानामुळे नाना ऊर्मी निर्माण होतात. एक म्हणतात सर्व ब्रह्म आहे तर मग क्रियाकर्माची काय गरज? एक म्हणतात, हा सगळा अधर्म आहे. त्याच्याविषयी बोलू नये.

एक म्हणतात सर्व नष्ट होते. उरलेले असते तेच ब्रह्म असते. एक म्हणतात असं नाहीये, समाधान हवे. सर्व ब्रह्म-केवळ ब्रम्ह दोन्ही पूर्वपक्षांचे भ्रम आहेत. अनुभवाचे वेगळे काही वैशिष्ट्य आहे, असे काही जण म्हणतात. हे होत नाही, अनिर्वाच्य वस्तू दिसत नाही, त्याच्यापुढे वेदशास्त्र मौन आहेत. तेव्हा श्रोता म्हणाला, निश्चय कोणी केला, अनुभवाला द्वैत उरत नाही. सिद्धांत मत जर आहे तर इथे अनुभवाचा कसा काय विचार करायचा? अनुभव हे प्रत्येक देहाला वेगवेगळे आहेत. हे पूर्वी सांगितले आहे आता काही सांगत नाही. एक जण साक्षीत्वाने सांगतात, साक्षी वेगळाच आहे असं म्हणतात. आपण द्रष्टा असं स्वानुभवाने सांगतात. दृश्यापासून द्रष्टा वेगळा आहे अशी अलिप्तपणाची खुण आणि आपण निराळे आहेत असे ते सांगतात.

सर्व पदार्थ जाणल्यावर तो पदार्थांपेक्षा वेगळा आहे. देह असूनही सहजपणे अलिप्तता आली आहे अशा प्रकारचे स्वानुभव काहीजण सांगतात. तर दृश्य असूनही वेगळे व्हावे असं काहीजण सांगतात. एक म्हणतात भेद नाही, वस्तू मुळातच अभेद आहे. तिथे हा मतीमंद दृष्टा हा कसा काय आणला? सगळी साखरच तिथे असेल तर त्याच्यातून कडू कसं काय बाहेर काढायचं? द्रष्टा असतो तो अवघेच ब्रह्म असतो. प्रपंच परब्रम्ह अभेद आहे,

भेदवादी त्याच्यात भेद मानतात, पण आत्मा हा स्वानंद आहे तो आकाराला आलेला आहे. पातळ झालेले तूप घट्ट झाले त्याप्रमाणे निर्गुणालाच गुण प्राप्त झाले. तिथे पाहून वेगळं काय केलं? म्हणून दृष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य हे एकच जगदीश आहे. मग पाहण्याचे प्रयत्न कशासाठी करायचे? तर ब्रह्म सगळं साकारलेलं आहे असा एकाचा अनुभव आहे. असे दोन्ही स्वभाव येथे सांगितले जातात. सगळा आत्मा आकाराला आलेला आहे मग आपण वेगळे कसे काय उरलो? असा एकाने अनुभव सांगितला तर तिसरा सांगतोय सगळा प्रपंच सोडून काहीच नाही तोच देव. दृश्य सगळं वेगळं केलं केवळ अदृश्य उरलं तेच ब्रह्म आहे असं एक म्हणतो, पण त्याला ब्रह्म म्हणू नये! हा उपाय नसून अपाय आहे.

शून्याला काही ब्रह्म म्हणता येईल का?सगळं दृश्य ओलांडलं त्याच्या पलीकडे गेलं आणि अदृश्य म्हणजे शून्य हाती पडले. ब्रह्म म्हणून तिथून मागे फिरला. इकडे दृश्य तिकडे देव आणि मध्ये शून्यत्वाचा ठाव त्याला मंदबुद्धी असलेला प्राणी ब्रह्म म्हणतो! राजाला ओळखलं नाही सेवकाला राजा समजला,पण प्रत्यक्ष राजाला पाहिल्यानंतर ते सगळे वाया गेलं. त्याप्रमाणे शून्याला वर्मा कल्पिले पण पुढे खरे ब्रह्म पाहिले तेव्हा शून्यत्वाचा भ्रम तुटून गेला. पण ज्याप्रमाणे राजहंस हा पाण्यापासून दूध वेगळे करतो त्याप्रमाणे हा सूक्ष्म अडथळा विवेकाने दूर करावा.

आधी दृश्य सोडून द्यायचं मग शून्यत्व ओलांडायचं आणि मूळ मायेच्या पलीकडचं परब्रम्ह पाहायचं! वेगळेपण दिसतो, तेव्हा वृत्ती शून्य होते आणि मनामध्ये संदेह निर्माण होतो. शून्यत्वाचा भिन्नपणे अनुभवले त्याला शून्य असं म्हटलं आणि वस्तू पाहिल्यानंतर अभिन्न आहे असं लक्षात आलं म्हणून आधी वस्तू पाहून अभिन्न झाले पाहिजे. असा संदेश समर्थ देत आहेत. पुढील कथा ऐकूया पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!