भावार्थ दासबोध -भाग १२८

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक ९ समास दुसरा ब्रम्हानिरुपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. जे जे काही साकारलेले दिसते ते ते कल्पांत झाल्यावर नाश पावते. स्वरूप मात्र सर्वकाळ असते. स्वरूप हे सर्वांचे सार आहे. ते खोटे नसून खरे आहे. ते नित्य निरंतर आहे. ते भगवंताचे निजरूप आहे. त्यालाच स्वरूप म्हणतात. याशिवाय त्याची वेगवेगळी नावे आहेत. त्याला नावांचा संकेत हा फक्त जाणण्यासाठी दिलेला आहे, मूलतः ते नामातित आहे. आतबाहेर सगळीकडे ते आहे पण विश्वाला दिसत नाही. जवळच असूनही नाहीसे झाल्यासारखे वाटते. असा जो देव आहे, त्यामुळे दृष्टी जी आहे ती पाहायला लागल्यानंतर सगळं दृश्यच दिसतं.

दृष्टीचा विषय दृश्य तोच अदृश्य झाला त्यामुळे दृष्टी संतोष पावते, परंतु ते दृश्य नव्हे. दृष्टीस दिसणारे सगळे नष्ट होते, असे वेदांत म्हटले आहे, म्हणून जे दृष्टीला दिसतं ते स्वरूप नाही. स्वरूप निराभास आहे आणि दृश्य प्रत्यक्ष दिसले तरी तो एक आभास आहे असं वेदांत शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. पाहिल्यावर दृश्य हे भासते वस्तु मात्र दृश्यापासून वेगळी असते. स्वानुभवाने पाहिल्यानंतर ते दिसते दृश्यसबाह्य.  ब्रह्म म्हणजे निराभास, निर्गुण आहे, त्याची काय खूण सांगावी? पण जवळच असते ते स्वरूप आहे. जसा आकाशामध्ये भास होतो आणि सगळ्यांमध्ये आकाश दिसते तसा सगळीकडे जगदीश आत बाहेर ओतप्रोत भरलेला आहे. पाण्यामध्ये तो आहे परंतु भिजत नाही, पृथ्वीमध्येच आहे पण झिजत नाही. अग्नीमध्ये तो आहे पण जळत नाही असे देवाचे स्वरूप आहे. तो चिखलामध्ये आहे पण बुडत नाही. तो वायू मध्ये आहे पण उडत नाही. तो सुवर्णामध्ये आहे तरी सुवर्णासारखा घडत नाही. असं जे सर्वत्र आहे पण अभेदामध्ये माजलेला भेद म्हणजे अहंकार असल्याने आकलन होत नाही.

या अहंकाराचे निरूपण सावधपणे ऐका.जे स्वरूपाकडे मिळते, अनुभवाकडे झेपावते, ते अनुभवाचे सगळे शब्द बोलून दाखवतो. मी स्वरूपच आहे असं म्हणतो ते अहंकाराचे रूप आहे. निरंकार असेल तो आपोआप वेगळा दिसतो.  स्वतः मीच ब्रह्म आहे हा अहंकाराचा भ्रम आहे, कारण ते सूक्ष्मामध्ये सूक्ष्म असते, पाहिले तरच दिसते. कल्पनेमुळे भाव समजतो पण वस्तू ही कल्पनातीत आहे म्हणून अनंताचा अंत लागत नाही. उभारणी आणि संहार हा एक शाब्दिक भेद आहे पण जे  निशब्द आहे ते आतच शोधले पाहिजे. आधीच  शब्दार्थ द्यावा मग त्यातील भावार्थ ओळखावा. भावार्थ पाहिला तर शब्दार्थ शिल्लक राहीलच कसा? सर्व ब्रह्म आणि विमल ब्रह्म हा बोलण्याचा अनुक्रम आहे. लक्ष्यार्थ पाहिला तर वाच्यांश उरत नाही.

सर्व विमल दोन्ही पक्ष शब्दार्थात विरून जातात आणि लक्ष्यांश शोधायला गेले तर पक्षपात घडतो. ही अनुभवाची गोष्ट आहे तिथे शब्दार्थ नाही पण जाणण्यासाठी हे सांगितले. परा, पश्यंती, मध्यमा वगैरे या चारी वाणी त्याच्यापुढे थिट्या पडतात, तर शब्दकलाकुसर करून कसे समजेल? शब्द बोलल्यावर अर्थ नष्ट होतो तिथे शाश्वतता कुठे भेटणार? प्रत्यक्षाला प्रमाण नाही, शब्द प्रत्यक्ष नाशवंत आहे, म्हणून शब्दामुळे पक्षपात घडतो. तो सर्वांमध्ये शुद्ध आहे, असा अनुभव जाणणारे जाणतात. आता अनुभवाचे लक्षण ऐका. अनुभव म्हणजेच अनन्य. त्या अनन्याचे लक्षण असं आहे. अनन्य म्हणजे अन्य नसलेले आत्मनिवेदन. मी पणाच्या त्यागानंतर मी आत्मा या अनुभवातील मी ही जाणीव संपल्यावर तदृपतेने केवल आत्माच उरतो असे गहन ज्ञान समर्थ देत आहेत. पुढील ज्ञान ऐकूया पुढील कथेमध्ये. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.