दशक नऊ समास ५ अनुमान निरसन नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मदेवाने सगळे निर्माण केले, पण ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केले? विष्णूने विश्व पाळले पण विष्णूचे पालन कोण करतो? रुद्र हा विश्वाचा संहार करतो पण रुद्राचा संहार कोण करतो? काळाचा नियंत्रक कोण आहे, हे समजलं पाहिजे. याचा विचार समजत नाही तो अंधःकार होय. म्हणून सारासार विचार करावा. ब्रह्मांड हे स्वाभाविक आहे पण पिंडासारखे आहे अशी कल्पना केली आहे.
कल्पना केली आहे पण प्रत्ययाला आलेले नाही. ब्रम्हांडाची प्रचिती पाहिल्यावर अनेक संशय निर्माण होतात ते काल्पनिक आहेत हे श्रोत्यांनी निश्चितपणे जाणावे. पिंडासारखी ब्रह्मांड रचना असे अनुमान कसे करता येईल? ब्रह्मांडात नाना पदार्थ आहेत ते पिंडात कसे येतील? साडेतीन कोटी भूत जाती, साडेतीन कोटी तीर्थे, साडेतीन कोटी मंत्र पिंडात कुठे आहेत? तेहतीस कोटी देव, ८८ हजार ऋषी, नवकोटी कात्यायनी पिंडात कुठे आहेत? ५६ कोटी चामुंडा कोट्यवधी जीव, ८४ लक्ष जीव यांची दाटी ब्रह्मांडात आहे. पिंडात कुठे आहे?
ब्रह्मांडामध्ये वेगवेगळे पदार्थ निर्माण झाले तितके पिंडामध्ये असतील का? अनेक औषधी, तितकी नाना प्रकारची रसाळ फळ, नाना बीजे, नाना धान्ये ती पिंडामध्ये सांगावी. हे काय सांगून संपत नाही, तरी उगाच कशाला बोलायचं? बोलले तरी अनुमान करता येत नसल्याने लाजिरवाणे आहे. याचे उत्तर असे, ब्रह्मांडामध्ये पाच भुते आहेत आणि पिंडामध्ये देखील पाचच आहेत, याची रोकडी प्रचिती येते. पाच भूतांचे ब्रम्हांड आणि पंचभौतिक पिंड याच्यापेक्षा वेगळं अनुमानाचं ज्ञान नाही. जितके अनुमानाचे बोलणे तितके तर्क काहीतरी अंदाज करायचे ते वमनासारखे त्यागावे. निश्चयात्मक अनुभवाचे तितकेच बोलावे. जे पिंडी ते ब्रह्मांडी? याची प्रचिती आली ना? पंचभूतांची गर्दी दोन्हीकडे आहे, म्हणून पिंड आणि ब्रह्मांड या दोन्ही देहातील स्थान, प्रमाण इत्यादी केवळ अनुमान आहे. इतकेच त्याचे समाधान सांगता येईल. असं समर्थ सांगतात. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अनुमान निरसन नाम समास पंचम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक नऊ समास सहा गुणरूप निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. आकाश जसं निराकार आहे तसा ब्रह्माचा विचार आहे. तिथे वायूचा विकार आहे तशी मूळ माया! हे दासबोधाच्या ज्ञान दशकांमध्ये सांगितलेलं आहे. मूळ मायेमध्ये पंचभूते कशी आहेत ते दाखवले आहे. त्यामध्ये पहिला जाणीव म्हणजे सत्वगुण, मधला तो रजोगुण आणि अज्ञान म्हणजे तमोगुण असं श्रोत्यांनी जाणावं. तिथे जाणीव म्हणजे काय तर पिंडाचा चौथा महाकारण देह म्हणजेच सर्वसाक्षी तुर्यावस्था, त्याप्रमाणे मूळ प्रकृती हे ब्रह्मांडीच्या देहाचे महाकारण आहे. म्हणून तिथे जाणिवेचे अधिष्ठान आले आहे. मूळ मायेच्या अंतर्गत गुप्त त्रिगुण वास करतात. संधी मिळताच ते स्पष्ट होतात म्हणून त्याला गुणक्षोभिणी म्हणतात.
गवताचे कणीस उकलून मोकळं होतं तशी मूळमाया अनायासे गुणांची निर्मिती करते. मूळमाया वायुस्वरूप आहे. तिचे गुण विकार पावताच ती गुणक्षोभिणीचे रूप धारण करते. पुढे सत्व, रज, तम गुण आणि मिश्रित स्वभाव निर्माण होतो. तिथे गुणांच्या ठिकाणी ओंकार शब्द येतो. या शब्दातून वेदशास्त्रांचा आकार झालेला आहे. त्रिगुणासह पंचभुते अष्टधा प्रकृती आणि वायूचा विकार यातून निर्माण झालेली आहेत. अधिक विचार करता वायूमुळेच हे सगळं झालेलं आहे. वायू नसला तर जाणीव होणार नाही जाणीव नसली तर नेणीव राहील आणि जाणीव नेणीव निर्माण करण्याचं काम वायू करीत असतो असं गहन ज्ञान समर्थ सांगत आहेत. पुढील माहिती ऐकू या पुढील कथेत. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे