दशक नऊ समास हा सात विकल्प निरसन नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. भोळा भाव आणि सिद्धीला जावे,हा उधारीचा उपाय आहे. रोकडा मोक्षाचा अभिप्राय विचाराने जाणावा. प्राणी मोकळा होण्यासाठी जाणीव पाहिजे. सर्व जाणल्यास तो सहजपणे निराळा होतो. काहीच माहिती नसणे म्हणजे अज्ञान, सगळे माहिती असणे म्हणजे ज्ञान. जाणीव असेल तर विज्ञान. ज्ञानाच्या जाणिवेचा लय झाल्यावर ज्ञान, म्हणजे स्वतः आत्मा होणे, जाणणे. अमृत सेवन करून अमर झाला तो लोकांना म्हणतो, मृत्यू कसा येतो?तसा विवेकी बद्ध माणसाला म्हणतो,जन्म कसा असतो? जाणता लोकांना म्हणतो तुम्हाला भूत कसं झपाटतं? तुम्हाला विष कसं चढतं? असं निर्वीष विचारतो. आधी बध्दासारखं व्हावं, मग विचारावं लागत नाही.
विवेक दूर ठेवून पाहणे हे बद्ध माणसाचं लक्षण आहे. जागा झालेला झोपलेल्यास म्हणतो का रे बरळतो? हा अनुभव घ्यायचा असेल तर झोपून पाहावे. ज्ञातेपण उगवले की तो बंधनात गुंतून पडत नाही. भुकेलेल्याची अनुभवप्राप्ती तृप्त झालेल्यास नाही. अशा तऱ्हेने ही शंका दूर झाली. ज्ञानामुळे मोक्षप्राप्ती झाली. विवेक पाहिल्यावर अंतरंग गवसले, असं समर्थ सांगतात. इतिश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे विकल्प निरसन नाम समास सप्तम समाप्त.जय जय रघुवीर समर्थ.
दशक नववे समास आठवा देहांत निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. ज्ञाता माणूस ज्ञानामुळे सुटला परंतु बद्ध माणसाला जन्म कसा येतो मृत्यूच्या वेळी बद्धाचे काय जन्मते बद्धप्राणी मरून गेले, तिथे काहीच उरलं नाही, जाणिवेचं विस्मरण मरणापूर्वी झालं.अशी शंका श्रोत्यांनी घेतली होती त्याचे उत्तर ऐका. आता अन्यत्र लक्ष देऊ नका असं वक्ता म्हणतो. पंचप्राण स्थळ सोडतात, प्राणरूप वासनावृत्ती, वासनामिश्रित प्राण देह सोडून जातात. वायू बरोबर वासना गेली, ती वायू बनून राहिली. तीच पुन्हा इच्छेनुसार जन्म घेऊन आली. कित्येक प्राणी पूर्णपणे मरतात, पुन्हा जन्म घेतात. पुण्य संपल्यावर त्यांना ढकलून दिले जाते त्यामुळे हातपाय दुखावतात. तरी ते पुन्हा जन्म घेतात.
सापाची दृष्टी पडल्यानंतर ती तीन दिवसांनी धन्वंतरी उठवतो,तेव्हा माघारी वासना येते.कित्येक शवे होऊन पडतात, कित्येक त्याला उठवतात, यमलोकीहून प्राणी माघारी आणतात. कितीकांना पूर्वीच्या शापामुळे वेगळा देह मिळाला, उशाःप मिळताच पुनः पूर्वीच्या देहात येतात. कित्येक लोकांनी जन्म घेतले कित्येकांनी परकायेत प्रवेश केला.असे अनेक जण आले आणि गेले. प्राण फुंकण्याने गती निर्माण होते त्याप्रमाणे वासनेमुळे गतिमान झालेला प्राण म्हणून मरण समयी बाहेर पडला म्हणून वायुरूप वासनेला जन्म आहे. मन वासनापूर्तीचे साधन असल्याने त्याला वायुसुत म्हटले जाते. मनाच्या नाना वृत्ती असतात, त्याच्यामध्ये वासना जन्म घेते.वासना दिसत नाही, परंतु आहे. वासना म्हणजे जाणीवेमुळे होणारी इच्छा, आशा. जाणीव हा मूळतंतू आहे, तो मूळमायेत कारणरूपाने मिश्रित झालेला आहे.
कारणरूप ब्रम्हांडामध्ये आहे,कार्यरूपाने ते पिंडामध्ये वर्तन करते घाईगर्दीने त्याचे अनुमान करता येत नाही.असे असले तरी सूक्ष्मपणे ते कारणरूप आहे. सगळे देव आणि भूतसृष्टी वायुरूपच आहे. वायूमध्ये नाना विकार आहेत, वायू पाहिला तरी दिसत नाही तशी जाणीव आणि वासना सूक्ष्म आहे. त्रिगुण आणि पंचभुते हे वायू मध्ये मिश्रित असतात त्याचे अनुमान करता येत नाही म्हणून त्याला मिथ्या म्हणू नये. वायू सहजपणे वाहिला तरी सुगंध दुर्गंध जाणवतात. उष्ण, शितल असलेला वायू तप्त निवांत झाला की प्रत्यक्ष प्राणीरूप घेतो. वायुमुळे ढग वाहतात, वायूमुळे नक्षत्र चालतात, सगळ्या सृष्टीची गती म्हणजे वायू आहे. वायुरूपाने देव आणि भूते अंगामध्ये आकस्मात येतात. विधिविदान केले तर प्रेते देखील सावध होतात. अंगात दैवत घालणे, ब्रह्मसंमध जातात, अशा अनेक गोष्टी सापडतात. वारे वेगळेपणाने बोलत नाहीत, देहात भरून डोलतात! कित्येक प्राणी वासना घेऊन जन्माला येतात. असं समर्थ सांगत आहेत. याबाबत अधिक माहिती ऐकू या पुढील भागात.जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे