भावार्थ दासबोध -भाग १३९

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक नऊ समास नऊ संदेहवारण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. आकाशाने दिवे लावले की दिव्यांनी आकाश प्रकाशित केले हे श्रोत्यांनी पाहिले पाहिजे. पाणी, तेज किंवा वारा गगनाला दूर सारू शकत नाही गगन हे सर्वत्र घनदाट असते ते दुसरीकडे जाईल कसे? किंवा पृथ्वी कठीण असली तरी गगनाने तिची चाळणी केली, पृथ्वीचे सर्वांग भेदून देखील गगन राहिलेले आहे. याची प्रचिती अशी आहे, जे जडत्वाला आलेले आहे ते नष्ट होते. आकाश मात्र जसेच्या तसे असते ते चळणार नाही. वेगळेपणाने पाहिलं तर ते आकाश, अभिन्न झाले तर ते ब्रह्म. आकाश हे कुठे हलत नाही, गगचा भेद कळत नाही, ब्रह्म पाहता येत नाही तरी पाहू गेल्यास ब्रह्मासारखे वाटते, त्याला आकाश म्हणावे. निर्गुण ब्रह्मासारखे भासले, त्याची कल्पना करता अनुमान केले, म्हणून कल्पनेसाठी ब्रह्माची उपमा दिली. कल्पनेचा जितका भास तितके आकाश जाणावे,

परब्रह्म मात्रनिराभास, निर्विकल्प आहे. पंचभुतांमध्ये त्याचा वास आहे म्हणून आकाश म्हटले.भुतांच्या आतमध्ये जो ब्रह्माचा अंश आहे तो म्हणजे आकाश. प्रत्यक्ष होते व जाते त्यामुळे गगनात काहीच बदल भेद होत नाहीत. पण ते अचल ब्रह्म कसे म्हणावे? पृथ्वीवर जीवन आहे,जीवन नसले तर अग्नी उरतो, अग्नि विझला तर वारा उरतो. तोही नष्ट होतो. खोटे आले आणि गेले पण त्यामुळे खरे होते तेही भंगले. असे प्रचितीला केव्हा आले? भ्रमामुळे प्रत्यक्ष दिसते, विचार केला तर तिथे काय आहे? भ्रमाचे मूळ असलेल्या जगाला खरं कसं म्हणावं? भ्रम शोधला असता काहीच नाही तिथे कशाने काय भेदलं म्हणायचं? भ्रमाने भेदले म्हटले तर भ्रमच मिथ्या आहे.

भ्रमाचे रूप मिथ्या झाले मग सुखाने भेदले असे म्हणावे. मुळातच खोटे, त्याने तसेच केले. खोट्याने उदंड केले तर आमचं काय गेलं? केलं म्हणतात नसतंच असं शहाणे माणसं जाणतात. सागरामध्ये खसखस तसं परब्रह्मात दृश्य. मतीसारखा मती प्रकाश अंतरामध्ये वाढतो. मती विशाल केली तिने अंतराळ कवळले, तो ब्रह्मगोल कवठासारखा भासेल. वृत्ती त्याच्याहून विशाल आहे त्याच्यापुढे ब्रम्हांड बोराएवढे. आपण विवेकाचा विस्तार केला तर मर्यादा ओलांडल्या तर ब्रह्मांड हे वडाच्या बीसारखे. त्यापेक्षा विस्तीर्ण झालो तर क्षुद्र वादाच्या बीच्या कोटीपट लहान सूक्ष्म ब्रह्मांड आहे. ब्रह्माचा आकार पहिला तर काहीच नाही आपण विचार केला आणि किती मोठे झालं तरी मर्यादा येतात. मग ब्रह्मांड किती लहान असेल ते देहधारी माणसाला कसे आकलन होईल? या ओवीत निर्गुण ध्यानाचे इंगित सांगितले आहे. अशाप्रकारे वृत्ती वाढवावी, पसरून नाहीशी करावी आणि पसरून नाहीशी करावी, पूर्णब्रम्हापर्यंत नेऊन चहूकडे पुरवावी. एक जवाचा आकाराचे सोने आणून त्याने  ब्रह्मांडाला मढविले तर ते कसं होईल याची कल्पना करून पहा बर मग लक्षात येईल. वृत्तीला जसजसे स्वरूपाचे आकलन होत जाईल तसतशी ती व्यापक होत जाऊन फाटून सूक्ष्म होईल. वितळत जाईल. ती पूर्णपणे नष्ट झाल्यावर आत्मसाक्षात्कार होईल. इथे शंका दूर झाली. श्रोत्यानो, संदेह धरू नका.

अनुमान असेल तरी विवेकाने अवलोकन करा. विवेकामुळे तुमचे अनुमान खोटे ठरेल, विवेकामुळे समाधान होईल. विवेकामुळे आत्मनिवेदन होईल आणि मोक्ष लाभेल. विवेकाने पूर्वपक्ष दूर सारला की सिद्धांत आत्मा प्रत्यक्ष गवसेल. त्याला कोणतेही प्रमाण लागणार नाही. हे अनुभवाचे बोल आहेत. सारासार विचार केल्यावर ते समजतील. मननं, ध्यास, साक्षात्कार करून पावन व्हावे! असं समर्थ सांगत आहेत. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे संदेह वारणनाम समास नवम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!