दशक नऊ समास दहा स्थिती निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मस्थितीचे निरूपण करताना समर्थ रामदास स्वामी महाराज सांगत आहेत,आपण स्वतःच ब्रह्मरूप झाल्यावर करणे न करणे याच्यामध्ये वावगे असे काहीच राहत नाही. राजाज्ञेला भिणारा भिकारी राजा झाला की त्याचे भय ही सरते आणि रंकपणही!वेदांनी वेदाज्ञाचे पालन करावे, सत्शास्त्रांनी शास्त्र अभ्यासावे तीर्थाने तीर्थाला कशाप्रकारे जायचे?
अमृताने अमृत प्राशन करावे, अनंताने अनंत पहावा, भगवंताने भगवंताची भक्ती कशी करावी? संताने असंतपण त्यागावे, निर्गुणाने निर्गुणाला फोडावे, स्वरूपाने स्वरूपामध्ये कशाप्रकारे रंगावे? अंजनाने अंजन लावावे, धनाने धन साधावे, निरंजनाने निरंजनपण कसे अनुभवावे? साधनाला साध्य करावे, ध्यानाला ध्येय करावे, उन्मनाने मनाला कोणत्या प्रकारे आवरावे? असा प्रश्न समर्थ विचारत आहेत. ज्याला पूर्णत्व प्राप्त झालं त्याला अन्य काही करण्याची गरज राहत नाही असा त्याचा अर्थ. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे स्थिती निरूपण नाम समास दशम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
जगत ज्योती नाम दशक दशम
श्रीराम सगळ्यांचे अंतःकरण एक आहे किंवा एक नसून अनेक आहे नेमके काय ते मला सांगावे असा प्रश्न श्रोत्याने प्रश्न विचारला आहे. अंतकरण एक आहे की वेगळे आहे याचे उत्तर श्रोत्यांनी ऐकायला हवं. सगळ्यांचे अंतकरण एक हा अनुभव निश्चित आहे. श्रोता म्हणाला, सगळ्यांना एकच अंतःकरण असेल तरी एकमेकांसारखे का होत नाहीत? एकाने जेवण केले तर सगळेजण तृप्त का होत नाहीत? एक निवांत असेल तर इतरही निवांत का होत नाही? एक मरण पावला तर दुसरे सगळे मरायला हवेत ना? एक सुखी आणि एक दुःखी असं लौकिक जीवनामध्ये दिसतं, मग अंतकरण एक आहे हे कसं जाणायचं? लोकांमध्ये वेगवेगळी भावना असते. एकाची भावना दुसऱ्या सारखी नसते म्हणून हे अनुमान करता येत नाही.
अंत:करण एक असतं तर एकाच दुसऱ्याला समजलं असतं आणि गुप्त गोष्टी काही राहिल्या नसत्या. काही चोरून ठेवता आले नसते. त्यामुळे अंतःकरण एक हे घडत नाही लोकांमध्ये विरोधाभास दिसतो तो कशामुळे? साप जर चावायला आला तर प्राणी भिऊन पळतो. मग एक अंतकरण असेल तर मग तो विरोध नसायला पाहिजे. अशा प्रकारची शंका श्रोत्यांनी विचारली. वक्ता म्हणाला, बावचळू नका, सावध होऊन निरुपण ऐका. अंत:करण म्हणजे जाणीव, जाणीव म्हणजे जाणता स्वभाव, देह रक्षणाचा उपाय हा प्रत्येक जण करीत असतो. सर्पाला जाणीव होऊन तो चावायला आला तर प्राण्याला देहरक्षणाची जाणीव होते आणि तो पळतो. दोन्हीकडे जाणीव आहे. दोन्हीकडे जाणीव एक असल्याचे पाहिले म्हणजे अंत:करण एकच आहे. विचार केला तर दोघांच अंतःकरण सारखं आहे हे प्रत्ययाला आले. जाणीवरूपाने हे अंत:करण एक आहे,
सगळ्यांचं जीवमात्रांना जाणीव ही सारखी असते. डोळ्यांनी दिसतं, जिभेने चव समजते, कानांनी ऐकू येत, स्पर्श, वास हे सगळ्यांना सारखं आहे. पशुपक्षी, किडा, मुंगी, जीवमात्र असतील त्या सगळ्यांना या जाणीवा सारख्या आहेत. सर्वांना पाणी हे शितल आहे, सर्वांना अग्नी हा दाहक आहे. सगळ्यांचा अंत:करण या गोष्टी जाणते. आवड निवड असली तरी देहस्वभाव वेगळा असू शकतो. अंत:करण मात्र सारखं असते. अशा तऱ्हेने सर्वांचं अंत:करण एक असते हे निश्चित झाले. आता तुमची शंका फिटली आहे. तुम्ही अनुमान करू नका. जाणीवेमुळे जीव चारा घेतात, जाणीवेमुळे घाबरून लपतात, जाणीवेमुळे पळून जातात. किडामुंगीपासून ब्रह्मादिक अशा सगळ्यांना अंतकरण एक आहे. या गोष्टीचे कौतुक प्रत्ययाने, अनुभवाने जाणावे.
लहान मोठा असला तरी अग्नी, थोडं असलं किंवा जास्त असलं तरी पाणी, कमी अधिक असलं तरी प्राणी हे अंत:करण आणतात. कुठे जास्त, कुठे अधिक परंतु मूळ जिन्नस, नमुना एक आहे. हालचाल करणारा कोणताही प्राणी जाणिवेशिवाय नाही. असं समर्थांनी सांगितलं आणि हा भाग इथे समाप्त झाला. पुढील कथा ऐकू या पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे